28 February 2020

News Flash

..तर योगेश घोलप यांचा राज्यपालांकडे राजीनामा

आंदोलकांनी घोलप यांच्या घरासमोर ठिय्या देत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.

मराठा आंदोलकांशी संवाद साधताना शिवसेनेचे उपनेते बबन घोलप.

मराठा क्रांती मोर्चासमोर बबन घोलप यांची भूमिका

नाशिक : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदार, खासदारांचे कार्यालय, निवासस्थानांसमोर सुरू असलेल्या आंदोलन मालिकेत सोमवारी सकाळी शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देण्यात आला. मुंबईत आयोजित शिवसेना आमदारांच्या बैठकीसाठी योगेश घोलप हे गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत शिवसेना उपनेते बबन घोलप यांनी संवाद साधत आरक्षणावर शिवसेनेने सकारात्मक भूमिका न घेतल्यास मुलगा योगेश आमदारकीचा राजीनामा थेट राज्यपालांकडे देईल, अशी तयारी दर्शविली.

मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलनाद्वारे लोकप्रतिनिधींवर दबाव टाकला जात असल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सत्ताधारी भाजपचे डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सीमा हिरे या मराठा आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. या मागणीसाठी पुढील काळात जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय आमदार, खासदारांचे घर, कार्यालयांसमोर आंदोलन करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. त्या अंतर्गत भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या दिल्यानंतर सोमवारी आंदोलकांनी शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांच्या निवासस्थान गाठले. विहितगाव येथे घोलप यांचे निवासस्थान आहे. आंदोलक निवासस्थानी पोहोचू नयेत म्हणून दिशादर्शक फलक रात्रीतून बदलले गेल्याचा आक्षेप नोंदविला गेला. या वेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले.

आंदोलकांनी घोलप यांच्या घरासमोर ठिय्या देत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. बबन घोलप यांनी आंदोलकांमध्ये स्थानापन्न होऊन सर्वाचे म्हणणे जाणून घेतले. संवाद साधताना आपण आणि आपला मुलगा मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे नमूद केले. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरीत आरक्षण मिळायला हवे. शिवसेना बैठकीत भूमिका ठरवणार आहे. ती सकारात्मक नसल्यास मुलगा योगेश घोलपला राज्यपालांकडे राजीनामा देऊन येण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या आपण पाठीशी असल्याचे बबन घोलप यांनी सांगितले. आंदोलनात करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम यांच्यासह सदस्य मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आज अनिल कदम, शनिवारी छगन भुजबळ

मंगळवारी सेनेचे आमदार अनिल कदम यांच्या ओझर येथील संपर्क कार्यालयासमोर, तर शनिवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होणार आहे. त्यात मराठा समाजातील घटक गुरे-ढोरे घेऊन कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरतील. रस्त्यावर ठाण मांडून स्वयंपाक करतील. या आंदोलनाची जनजागृती ग्रामीण भागात करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत बुधवारी गिरणारे येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

First Published on July 31, 2018 2:02 am

Web Title: shivsena babanrao gholap said about yogesh gholap on maratha reservation
Next Stories
1 रिक्षाचालकाची बांधकाम व्यावसायिकास मारहाण
2 ११ हजार टन कांदा खरेदी करूनही भाव अस्थिरच
3 शिर्डीत फक्त चार दिवसांत सहा कोटी ६६ लाख रुपयांचं दान
Just Now!
X