News Flash

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करा

राज्य शासनाने शिवसेनेच्या रेटय़ानंतर ३४ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली.

मनमाड येथे बँकेसमोर आंदोलन करताना शिवसैनिक.

‘ढोल बजाओ’ आंदोलनात शिवसेनेची मागणी

कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बँक व्यवस्थापनाने जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेना शहर शाखेतर्फे शिवाजी चौकात विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रवेशद्वारासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अशा घोषणा आणि ढोल-ताशाच्या गजराने परिसर दणाणून गेला.

शिवसेना जिल्हा संपर्क नेते अल्ताफ खान, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, शहरप्रमुख मयूर बोरसे आदींच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

राज्य शासनाने शिवसेनेच्या रेटय़ानंतर ३४ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली. पण या घोषणेनंतरही प्रत्यक्षात कर्जमुक्ती मिळालेली दिसत नसल्याने ही घोषणा फसवी असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. यामुळे सर्व संबंधित बँकांनी प्रत्यक्षात कर्जमुक्ती दिलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी ढोल-ताशे वाजवून बँक व्यवस्थापनाकडे करण्याचे आंदोलन शिवसेनेने शिवाजी चौकातील विविध बँकांच्या परिसरात केले.

या चौकात महाराष्ट्र बँक, देना बँक, सेंट्रल बँक आदी राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांची कार्यालय आहेत. शिवसैनिकांनी भगवे ध्वज फडकावत आणि कर्जमुक्तीच्या घोषणा देत ढोल बजाव आंदोलन केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटींच्या कर्जमुक्तीची घोषणा करूनही प्रत्यक्षात कर्जमाफी झाल्याची माहिती कोणतीही बँक देत नाही. त्यामुळे ही फसवी घोषणा असल्याचा शेतकऱ्यांचा समज होत आहे. हा विषय लालफितीच्या कारभारात अडकवून न ठेवता तातडीने कर्जमुक्तीची कार्यवाही करावी, असे निवेदन शिवसेनेकडून विविध बँकांच्या प्रशासनाला देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 3:27 am

Web Title: shivsena demand to declare debt free farmers list in dhol bajao movement
Next Stories
1 ‘समृद्धी’ विरोधाने प्रशासनाच्या अडचणींत भर!
2 मालेगावमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात
3 ट्रक चालक आणि क्लिनरच्या धाडसाने लुटारू पोलिसांच्या ताब्यात; तीन जण फरार
Just Now!
X