नाशिकमध्ये भाजपच्या महिला मेळाव्यात राडा घातल्याप्रकरणी शिवेसना नेते सुधाकर बडगुजर यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. या मेळाव्यात गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांमध्ये सुधाकर बडगुगर यांचा समावेश असल्याची बाब काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाली होती. मात्र, नाशिकमध्ये शनिवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी बडगुजर यांची अटक लांबणीवर पडली होती. त्यामुळे कार्यक्रम आटोपून दोन दिवस उलटल्यावर आता त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या अटकेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाद शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या अटकेनंतर उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.तत्पूर्वी शिवसेना महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह एकूण आठ शिवसैनिकांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
‘मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच शिवसैनिकांवर दरोडय़ाचा गुन्हा’ 
२३ मार्च रोजी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठवाडा व विदर्भाच्या संदर्भाने केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी बोधलेनगर येथे भाजप महिला आघाडीचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. या वेळी खुर्च्यांची फेकाफेक झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यामध्ये सुधाकर बडगुजर आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. आंदोलना वेळी हाती लागलेल्या सेनेच्या महिलांना भाजपच्या महिलांनी झोडपले. या प्रकरणी भाजप आमदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गाडेकर यांच्यासह आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात भाजपने पोलिसांवर दबाव आणून दरोडय़ासारखा गंभीर गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला होता.
शिवसेनेकडून भाजपची तुलना भुंकणाऱ्या कुत्र्याशी; युतीत राजकीय शिमगा