21 January 2019

News Flash

लांब पल्ल्यासाठी स्लीपर कोच शिवशाही

गेल्या वर्षी सुरू झालेल्या शिवशाही बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक विभागात एसटीच्या २० गाडय़ा दाखल होणार

शिवशाही बस सेवेने उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने लांब अंतरावरील प्रवास अधिक सुखद करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार लांब पल्ल्याच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी नाशिकहून पाच मार्गावर वातानुकूलित शिवशाही स्लीपर कोच सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यात तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, हैदराबाद या मार्गाचा समावेश आहे. त्यासाठी २० शिवशाही स्लीपर कोच बसची मागणी नोंदवली असून या महिनाअखेपर्यंत त्या दाखल होण्याची शक्यता आहे.

लाल रंगातील सर्वसाधारण बस आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा देणाऱ्या, परंतु अधिक भाडे आकारणी करणाऱ्या शिवनेरी बस यामध्ये शिवशाहीचा पर्याय ठेवत महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या शिवशाही बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निमआराम बसच्या तुलनेत शिवशाहीचे काही प्रमाणात अधिक भाडे आहे, परंतु खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत ते कमी आहे. यामुळे खासगी वाहतुकीकडे गेलेला प्रवासी शिवशाही अवतरल्यानंतर पुन्हा माघारी फिरल्याचे चित्र आहे. सध्या महामंडळाच्या नाशिक विभागाकडे ५८ शिवशाही बस आहेत. त्यांच्यामार्फत नाशिकहून पुणे, बोरिवली, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई सेंट्रल आदी ठिकाणी वातानुकूलित प्रवासाची सेवा दिली जाते. नाशिक-पुणे हा विभागात नफा देणारा मार्ग आहे. या मार्गावर विनावाहक निमआराम बसऐवजी आता शिवशाही बस धावतात. शिवशाही बसने महामंडळाला निमआराम बसच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळत आहे. या बसला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आता लांब अंतराच्या प्रवासासाठी प्रवाशांना झोपण्याची सुविधा उपलब्ध करणाऱ्या शिवशाहीची बस उपलब्ध करण्यात येणार आहे. लांब अंतराच्या मार्गासाठी नाशिक विभागाने २० स्लीपर कोच बसची मागणी नोंदविल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. या महिनाअखेपर्यंत नवीन बस दाखल होतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या बैठी आसन व्यवस्था असलेल्या ५८ शिवशाही बस नाशिक विभागाच्या ताफ्यात आहेत. ज्या मार्गावर निमआराम बस सुरू होत्या, त्या ठिकाणी शिवशाही सुरू करण्यात आल्या. यामुळे संबंधित निमआराम बसचा आता इतर मार्गासाठी वापर केला जात आहे.

स्लीपर कोचमधील सुविधा

स्लीपर कोच शिवशाही आधिक्याने रात्रीच्या वेळी धावतील. या वातानुकूलित बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि आग प्रतिबंधक यंत्रणाही आहे. भ्रमणध्वनी चार्जिग, मोफत इंटरनेटची सुविधा आहे. प्रवाशांना ब्लँकेट, उशी मोफत मिळणार आहे. झोपण्याची व्यवस्था असलेल्या या बसमध्ये ३० आसन व्यवस्था राहील.

असे उत्पन्न वाढले

निमआराम बसच्या माध्यमातून राज्य परिवहनला प्रतिकिलोमीटर २७ रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवशाही बसचे हे उत्पन्न प्रतिकिलोमीटर ४७ रुपये इतके आहे. प्रतिकिलोमीटरच्या उत्पन्नात प्रतिकिलोमीटरला १० रुपये अधिक मिळतात. नाशिक विभागात ५८ शिवशाही वेगवेगळ्या मार्गावर धावत आहेत. त्यांच्या दैनंदिन हजारो किलोमीटरचा विचार केल्यास राज्य परिवहनच्या एकूण उत्पन्नात मोठी भर पडल्याचे अधिकारी मान्य करतात.

First Published on April 7, 2018 3:12 am

Web Title: shivshahi sleeper coach buses for long journey