गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रानेच मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासादरम्यान उघडकीस आला. नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी (ता. नांदगाव) येथील शिक्षक कैलास राठोड याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येचा तपास लावण्यात नाशिक पोलिसांना यश आले. आरोपी काळू सुकलाल राठोड (रा.न्यायडोंगरी) याने नांदगाव पोलिसांसमोर मित्राचा खून केल्याची कबुली दिली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील शिक्षक कैलास राठोड यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले. यावेळी पोलिसांना घटनास्थळी राठोड याचा मृतदेह मिळाला.

प्राथमिक चौकशीनंतर नांदगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये संशयित आरोपी काळू आणि मृत कैलास हे हत्या झाली त्या दिवशी दुपारी सोबत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने काळू सुकलाल राठोड याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  पोलिसी  खाक्या दाखवताच काळूने पैशाच्या लालसेतून मित्राची हत्या केल्याचे कबुल केले. मित्राचा खून केल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे दगडाला बांधून विहरीत फेकले होते. यावेळी त्याने मृत मित्राजवळील पैसे चोरल्याची माहिती देखील पोलिसांना दिली. एवढेच नाही तर चोरलेले पैसे मक्याच्या शेतातून काढून दिले. चोरलेल्या पैशातून त्याने गहान ठेवलेली दुचाकी सोडवून आणली होती. अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी राहुल खाडे, पोलिस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, उपनिरीक्षक बालाजी पद्मने, रमेश पवार, विश्वनाथ धारबळे, सुदेश घायवट, पंकज देवकाते, सागर जगताप आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला.