टाळेबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याच्या प्रक्रियेतील भाग म्हणून शनिवारपासून ‘सम-विषम’ पध्दतीने दुकाने उघडण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न पहिल्याच दिवशी फोल ठरला. मेनरोड, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, शालिमार अशा मध्यवर्ती बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवरील दोन्ही बाजुंची दुकाने नेहमीप्रमाणे खुली राहिली. खरेदीसाठी चारचाकी वाहन नेण्यास प्रतिबंध आहे. परंतु, मुख्य बाजारपेठेत ग्राहक आणि त्यांच्या वाहनांची इतकी गर्दी झाली की, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

रस्त्याच्या सम तारखांना एका बाजूकडील आणि त्यासमोरील बाजूकडील दुकाने विषम तारखेला उघडण्याच्या निर्णयाची अमलबजावणी पहिल्या दिवशी पुरेशी माहिती वा स्पष्टता नसल्याने होऊ शकली नाही. अनेक रस्त्यांवर दोन्ही बाजूकडील दुकाने उघडी राहिली.

मुख्य बाजारपेठेत असा काही निकष असल्याचे दिसत नव्हते. निर्बंध शिथील होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी चांगलीच गर्दी झाली. रविवार कारंजा, महात्मा गांधी रस्त्यावर मोठय़ा संख्येने चारचाकी, दुचाकी वाहने उभी करण्यात आली. मुळात खरेदीसाठी जातांना चारचाकी वाहनांचा वापर करण्यास मनाई आहे. परंतु, तो निकषही पाळला गेला नाही. कोंडीमुळे वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले. वाहतुकीत अडथळे आणणाऱ्या वाहनधारकांविरुध्द कारवाईचा बडगा उगारावा लागला.

सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत बहुतांश दुकाने उघडी होती. सम-विषमच्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी व्हावी म्हणून पालिकेचे विभागीय अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी यांच्या संयुक्त बैठका झाल्या. निकषानुसार दुकाने, व्यापारी संकुल आदी कशा प्रकारे सुरू ठेवले जाईल, याबाबत नियोजन करण्यात आले. उपरोक्त निकषानुसार व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करावे लागेल. अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. अनेक भागात सम-विषमचे क्षेत्र निश्चित नाही. यामुळे गोंधळ उडाला. अशा रस्त्यांवर तो निकष ठरविण्याचे काम पालिकेने पोलिसांच्या मदतीने केले. ज्या रस्त्यावर एकाच बाजूला दुकाने आहेत, तेथील दुकानांचे काय, हा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे.

निर्णयाचा प्रभाव नाही

व्यापारी वर्गाला कल्पना देण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांनी बाजारपेठांसह अनेक रस्त्यांवर वाहनांवरील ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती दिल्याचे पालिका उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी सांगितले. पहिल्या दिवशी निर्णयाची प्रभावीपणे अमलबजावणी झाली नसल्याचे पालिकेने मान्य केले आहे.