समाज माध्यमांवर आज लघुपट प्रदर्शित होणार

चारूशीला कुलकर्णी, नाशिक

नाशिक : हातातील काम गेले, तसे गडय़ा आपला गाव बरा, असे म्हणत परप्रांतीय तसेच राज्यातील चाकरमान्यांनी आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला. विस्थापनाचे आव्हान पेलत असतांना थकलेल्या जीवांना पायपीट करत पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा यापलीकडे असणाऱ्या माणसांच्या गरजांचा विचार होणे अपेक्षित आहे. करोनाच्या पाश्र्वभूमिवर मदतीचा हात पुढे येत असतांना असे काही प्रसंग समोर येतात की दाता किती हतबल आहे हे ठळकपणे दिसते. या सर्वाचे प्रतिबिंब प्राजक्त देशमुख यांच्या ‘पायपीट’ या लघुपटात उमटले असून हा लघुपट मंगळवारी समाज माध्यमात प्रदर्शित होणार आहे.

करोना विषाणूचा संसर्ग राज्यात फैलावत असतांना त्याला अटकाव करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने टाळेबंदी लादली. आजाराची, त्याच्या व्याप्तीची कुठलीही कल्पना नसलेला हातावर पोट असलेला मजूर, समाज व्यवस्थेतील तळाचा घटक या टाळेबंदीने पूर्णत़ दबला गेला. वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून सरकारने टाळेबंदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हातातील काम गेले तसे खिशातला पैसाही संपला. मायदेशी असलेली चिंतातूर मंडळी आणि घरात घुसमटत असलेले चेहरे पाहता काहींनी मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे  पायपिटीची अखंड मालिकाच सुरू झाली.

पायी, दुचाकी, सायकल, मिळेल त्या वाहनाने या मंडळींना गावाकडे जाण्याची आस आहे. सरकार ‘घरी रहा सुरक्षित रहा’ सांगत असले तरी आर्थिक चणचण, वेगवेगळ्या अडचणींमुळे घर त्यांच्या दृष्टीने सुरक्षित राहिलेच नव्हते. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी घरातून बाहेर पडण्याचा स्विकारलेला पर्याय आणि सुरू झालेली तगमग, अस्वस्थता, अन्न तसेच पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी घामेजलेले चेहरे या पलिकडे असणारी भावना प्राजक्त यांनी लघुपटात मांडली आहे. फाळणीच्या वेळी, गिरणी कामगारांच्या बाबतीत आणि आता करोनाच्या पार्श्वभूमीवर विस्थापन मोठय़ा प्रमाणावर होत आहे. विस्थापितांशी बोलतांना आपण नि:शब्द होतो. हे धुसफुसणं शब्दबध्द करण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे प्राजक्त यांनी सांगितले.

लघुपटाचे निवेदन अभिनेते-कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांचे असून संगीत श्रीनाथ म्हात्रे यांचे आहे. अभिषेक कुलकर्णी यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली असून राजेश भुसारे हे निर्मिती प्रमुख आहेत. लघुपटाचे दिग्दर्शन आणि संकल्पना  प्राजक्त देशमुख यांचे आहे.

आपण हतबल

पायपीट करणाऱ्या लोकांना मदत व्हावी म्हणून भल्या पहाटे त्यांच्यासाठी खाण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत होतो. त्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतो. एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतांना अचानक गाडीसमोर बायका-मुले घोळक्याने आमच्याजवळ आले. समोर उभ्या असलेल्या माणसाकडे बोट दाखवत त्याने आमचा भ्रमणध्वनी आणि जवळचे पैसे चोरल्याचे सांगू लागले. तो बिहारचा असून आम्ही उत्तर प्रदेशचे आहोत. त्याला पकडा असे म्हणत त्या जोरात रडु लागल्या. त्यांचे डोळे, त्यातील वेदना नाही विसरू शकत. अन्न, पाण्याच्या पलीकडे त्यांना एक मदत हवी होती. पण ती देण्यासाठी आम्ही हतबल ठरलो. सामान्य माणसाच्या पलिकडे याची व्याप्ती आहे. हा अनुभव सुन्न करून गेला.

– प्राजक्त देशमुख  (लेखक)