महापालिकेला आज इंजेक्शन मिळण्याची शक्यता; गरज सहा हजारांची अन् पुरवठा निम्माच

नाशिक : जिल्ह्यातील शासकीय, महापालिका रुग्णालयात आठ हजार तर खासगी रुग्णालयात साधारणत: चार हजार करोना रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. विशिष्ट परिस्थितीत काही गंभीर रुग्णांना रेमडेसिविर द्यावे लागते. जिल्ह्याची सध्याची गरज पाच ते सहा हजार इंजेक्शनची असताना त्याचा निम्म्याहून कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने २० हजार इंजेक्शनची मागणी नोंदविली. मंगळवारी त्यातील काही इंजेक्शन मिळण्याची शक्यता आहे.

मागणी प्रचंड वाढल्याने या इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात काळा बाजारही होत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात रेमडेसिविरच्या तुटवडय़ामुळे प्रशासकीय पातळीवर झालेले नियोजन कोलमडले. इंजेक्शनसाठी दुकानांसमोर रांगा लागल्या. कित्येक तास उभे राहूनही इंजेक्शन मिळत नसल्याची व्यथा शेकडो जणांनी मांडली. नातेवाईकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर प्रशासकीय पातळीवर रेमडेसिविरच्या वितरणाचे फेरनियोजन झाले. नातेवाईकांची गर्दी, गोंधळ, काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने इंजेक्शनचा वितरकामार्फत थेट रुग्णालयांना पुरवठा करण्याचे निर्देश दिले. व्यक्तिगत पातळीवर विक्री मर्यादित करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याची सध्याची दैनंदिन गरज पाच ते सहा हजार इंजेक्शनची आहे. त्या प्रमाणात ती उपलब्ध नाही. रविवारी जिल्ह्यासाठी केवळ ३३२८ रेमडेसिविर प्राप्त झाले. सोमवारी दुपापर्यंत केवळ ५६४ इंजेक्शन मिळाले होते. त्यातील ४०० इंजेक्शन दोन मोठय़ा रुग्णालयांनी स्वत: त्यांच्यासाठी मागवली. उर्वरित १६४ अन्य रुग्णालयांसाठी उपलब्ध झाले. पुढील एक, दोन दिवस पुरवठा असाच राहणार आहे.

एक कंपनी नाशिकला आधी हजारोंच्या संख्येत इंजेक्शनचा पुरवठा करायची. मध्यंतरी करोनाचा प्रादुभाव कमी झाल्यावर संबंधित कंपनीने इंजेक्शन निर्मिती थांबवली होती. आता पुन्हा निर्मिती सुरू झाली असली तरी इंजेक्शन बनविण्याची २१ दिवसांची संपूर्ण प्रक्रिया असते. विहित कालावधीनंतर संबंधित कंपनीकडून नाशिकला अधिक पुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.

रेमडेसिविरच्या तुटवडय़ावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने २० हजार इंजेक्शन खरेदीची मागणी नोंदविली आहे. त्यासाठी आगाऊ रक्कमही भरण्यात आली. मंगळवारी त्यातील काही इंजेक्शन प्राप्त होतील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

रुग्णालयातील वापरावरही लक्ष

रेमडेसिविरचा काळा बाजार रोखण्याबरोबर रुग्णालयात त्याचा योग्य वापर होतोय की नाही हे तपासण्यासाठी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची तर लसीकरण प्रक्रिया सुरळीत सुरू राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या संदर्भात नियुक्तीचे आदेश काढले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा स्तरावर पथके तयार करून रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता, विक्री योग्य किंमतीत होते की नाही याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरला पंचवटीत अटक

रेमडेसिवीर इंजेक्शनचा शहर परिसरात तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन पंचवटीतील एका खासगी डॉक्टराकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. १६ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. डॉ. रवींद्र मुळक असे या डॉक्टरचे नाव आहे.  इंजेक्शन तुटवडय़ाचा फायदा घेत आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न काही डॉक्टरांकडून होत आहे. एका रुग्णाला रेमडेसिवीरची गरज भासल्याने त्याच्या नातेवाईकाला पंचवटी येथील सद्गुरू रुग्णालयातील डॉ. रवींद्र मुळक यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शन  असल्याची माहिती मिळाली. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरशी संपर्क साधल्यावर एका इंजेक्शनसाठी २५ हजार रुपये लागतील, असे सांगण्यात आले.  नातेवाईकांनी खरेदीची तयारी दर्शविली. पंचवटीतील अमृतधाम येथे इंजेक्शन घेण्यासाठी डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाला बोलविले. रुग्णाचा नातेवाईक संबंधित ठिकाणी पोहोचल्यावर पाच हजार रुपये कमी असल्याने ते जवळील एटीएममधून काढून आणतो, असे डॉक्टरला सांगत नातेवाईकाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी संबंधित ठिकाणी येत डॉ. मुळक याला इंजेक्शन जादा दराने विकतांना ताब्यात घेतले.