नाशिकरोड कारागृह प्रशासनाचा निर्णय

नाशिकरोड कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेहून अधिक असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव कैद्यांसमोर ‘श्यामची आई’ पुस्तकाचे वाचन करू देण्यास नकार देण्यात आला. मात्र हे पुस्तक देणगी स्वरूपात कारागृहाच्या वाचनालयास दिल्यास शिक्षित कैद्यामार्फत त्याचे वाचन होईल, असा तोडगा कारागृह महानिरीक्षक कार्यालयाने सुचविल्यानंतर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या चार प्रती कारागृहाला देणगी स्वरुपात दिल्या आहेत.

साने गुरुजी यांच्या श्यामची आई पुस्तकाला ८५ वर्ष पूर्ण झाली असली तरी हे पुस्तक आजही तितकेच लोकप्रिय आहे. साने गुरुजी यांनी नऊ ते १३ फेब्रुवारी १९३३ या कालावधीत हे पुस्तक नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात लिहिले. या दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आठ फेब्रुवारी रोजी ज्या स्थळी हे पुस्तक लिहिले, तिथे नतमस्तक होऊन कैद्यांसमोर या पुस्तकाचे एक प्रकरण वाचून साने गुरुजींना अभिवादन करण्यासाठी तशी परवानगी  जळगाव येथील हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर  कुळकर्णी यांनी कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडे मागितली होती. या पत्रास उत्तर न देता  त्यांना ताटकळत ठेवले.

प्रदीर्घ काळ लोटूनही पुस्तकाप्रती वाचकांचा जिव्हाळा कायम आहे. हे लक्षात घेऊन कुळकर्णी यांनी साने गुरुजींना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याची संकल्पना मांडली. जानेवारी महिन्यात पाठवलेल्या पत्राला उत्तर मिळत नसल्याने त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा केला होता.  राज्यातील १० कारागृहांमध्ये त्यांनी यापूर्वी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळांचे आयोजन करून चार हजार कैद्यांना मार्गदर्शन केले आहे. नाशिकरोड कारागृहात परवानगी मागताना त्यांनी यापूर्वी कारागृह महानिरीक्षक कार्यालयाने सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेसाठी दिलेल्या मंजुरीचे पत्रही संदर्भ म्हणून सोबत जोडले. या घडामोडींवर यावर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यावर कारागृह महानिरीक्षक कार्यालयाने तातडीने दखल घेत  कारागृहात क्षमतेहून अधिक कैदी असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव तशी परवानगी देता येणार नसल्याचे  कार्यालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु, पर्याय म्हणून त्यांना कारागृहाच्या वाचनालयास हे पुस्तक देणगी स्वरुपात भेट देण्यास सुचविले. कार्यालयाने सुचविल्यानुसार कुळकर्णी यांनी श्यामची आई पुस्तकाच्या चार प्रतींसह ती आणि मी, वो और मै, जीवनाची शाश्वत मूल्ये आणि प्रत्येकात विवेकानंद या पुस्तकांच्या एकूण १३ प्रती कारागृहात बंदीजनांसाठी देणगी स्वरूपात कारागृहाचे प्रमुख राजकुमार साळी यांच्याकडे सुपूर्द केल्या.

चांगल्या उपक्रमांना परवानगीचा अडसर

कैद्यांची संख्या अधिक असल्याने या उपक्रमास सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली. भविष्यातही अशा चांगल्या उपक्रमांना परवानगी मिळणार नाही का, असा प्रश्न कुळकर्णी यांनी आता कारागृह महानिरीक्षक कार्यालयाला पाठविलेल्या पत्रात केला आहे. कारागृहात क्षमतेहून अधिक कैद्यांची संख्या आहे. पण, त्यातील मोजक्या मराठी संवेदनशील मनाच्या कैद्यांसमोर श्यामची आई पुस्तकाचे एक प्रकरण वाचले असते तर अधिक समाधान मिळाले असते असेही त्यांनी म्हटले आहे.