नाशिक : कर विभागातील साहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांच्या आत्महत्येच्या घटनेने महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कामाच्या तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. धारणकर यांच्या कुटुंबीयांनी तशी भावना व्यक्त केली, तर जिल्हा शासकीय रुग्णालयात सापडलेल्या चिठ्ठीत त्यासंबंधीचा उल्लेख आहे. चिठ्ठीतील हस्ताक्षर त्यांचे आहे की नाही, याची पडताळणी हस्ताक्षरतज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे. कुटुंबीयांचा जबाब आणि हस्ताक्षराचा अहवाल या आधारे पुढील कार्यवाही होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

गुरुवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन धारणकर यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर पालिका वर्तुळात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी पालिका वर्तुळात उमटले. अडीच महिन्यांपूर्वी साहाय्यक अभियंता रवींद्र पाटील हेदेखील कामाच्या तणावाचे कारण देऊन बेपत्ता झाले होते. सात दिवसांनंतर त्यांचा शोध लागला होता. पोलिसांनी पाटील यांना पुण्याहून सुखरूप नाशिकला आणले. धारणकर यांच्या आत्महत्येमागे तसेच कारण असल्याची साशंकता कुटुंबीयांनी वर्तविली. जिल्हा रुग्णालयात धारणकर यांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली. त्यात कामाच्या तणावाचा उल्लेख आहे. कुटुंबीय धक्क्यातून सावरले नसल्याने शुक्रवारी दुपापर्यंत त्यांचे जबाब घेणे शक्य झाले नाही, असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले. म्युन्सिपल कर्मचारी, कामगार सेनेने धारणकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा रुग्णालयात सापडलेल्या चिठ्ठीत कामाच्या तणावाचा उल्लेख आहे. कुटुंबीयांची कामाचा तणाव असल्याची भावना आहे. चिठ्ठीतील हस्ताक्षर धारणकर यांचे आहे की नाही, याची तपासणी हस्ताक्षरतज्ज्ञांकडून केली जाईल. त्यासंबंधीचा अहवाल, कुटुंबीयांचा जबाब या आधारे तपासात जे समोर येईल, त्या आधारे पुढील कार्यवाही होईल.

      – डॉ. रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त

ताणाचा संबंध नाही

महापालिका मुख्यालयात घरपट्टी विभागात कार्यरत दिवंगत संजय धारणकर हे मागील पाच महिन्यांच्या कालावधीत ४२ दिवस वेगवेगळ्या कारणांस्तव सुटीवर होते. मार्च महिन्यात १६ ते २१ या कालावधीत त्यांनी वैद्यकीय कारणास्तव रजा घेतली. नंतर १३ जून ते १० जुलै या कालावधीत त्यांनी अमरनाथ यात्रेसाठी अर्जित रजा घेतली होती. पुन्हा १३ ते २३ जुलै असे सलग १० दिवस ते पुन्हा वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले. आठ दिवसांपूर्वी ते कामावर हजर झाले. घरपट्टी विभागातील साहाय्यक अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यावर हाताखालील कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवून कामे करवून घेण्याची जबाबदारी असते. कार्यालयीन स्वरूपाचे हे काम आहे. बाहेर जाण्याचे काम नसते. धारणकर यांची बदलीदेखील केलेली नव्हती. त्यांच्या मागणीनुसार त्यांना हव्या तितक्या सुटय़ा देण्यात आल्या होत्या. सलग इतक्या सुटय़ा इतर कोणत्याही अधिकाऱ्यास दिल्या जात नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे अधिकार त्या त्या विभाग प्रमुखांना आहेत. सुटीच्या अर्जाशी आयुक्तांचा संबंध येत नाही. कर वसुलीचे २५० कोटींच्या उद्दिष्टात मागील थकबाकी समाविष्ट आहे. थकबाकी वसुलीची कार्यवाही दैनंदिन कामाचा भाग आहे. धारणकर रजेवर असताना विभाग प्रमुखांनी लिपिकाकडून त्यासंबंधीची कामे करून घेतली. दोन महिन्यांत २७ दिवस रजेवर असणाऱ्या धारणकर यांच्यावर कामाचा ताण होता, असे म्हणणे योग्य नाही.

      – महापालिका  प्रशासन