सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. वेगवेगळ्या सण, उत्सवाचे औचित्य साधत ऑनलाइनच्या माध्यमातून आपल्या आवडत्या व्यक्तीस वेगवेगळ्या भेटवस्तू देण्याचा पर्याय तरुणाईकडून स्वीकारला जात आहे. असे असले तरी बदलत्या काळातही जुन्या मंडळींकडून आजही टपाल विभागाच्या विविध सेवांना पसंती दिली जात आहे. दिवाळीचे औचित्य साधत जिल्ह्य़ातून खास भाऊबीजेसाठी २५०० मंडळींनी हा पर्याय स्वीकारला आहे. तर ३०० हून अधिक महिलांनी आपल्या भावाला भेटवस्तू देण्यासाठी स्पीड पोस्ट, पार्सल सेवेचा पर्याय स्वीकारला असून यात काही तरुण मंडळींचाही सहभाग आहे.

पूर्वी सण, उत्सव म्हटल्यावर शुभेच्छा पत्रांची देवाणघेवाण होत असे. दिवाळीत लहानग्यांकडून मामाच्या गावाला पत्र पाठवण्यापासून आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी पोस्टकार्डवर खास शुभेच्छा पत्र रेखाटत शुभेच्छा देत असत. काही वर्षांत शुभेच्छा पत्रांची जागा भ्रमणध्वनी, संगणकावरील लघुसंदेश, ई मेल यांनी घेतली. यामुळे शुभेच्छा पत्रांचे प्रमाण कमी झाले असले तरी दिवाळीत मात्र आजही वेगवेगळ्या कंपन्या, बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना, काही सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांकडून त्यांच्या हितचिंतकांना, मित्रपरिवाराला शुभेच्छा पत्र पाठविण्यात येते. बऱ्याचदा ही शुभेच्छा पत्रे दिवाळी झाल्यानंतर पोहचतात अशी तक्रार केली जाते. या पाश्र्वभूमीवर टपाल विभागाने शहर परिसरातील दोन मुख्य कार्यालयासह ५५ कार्यालयांमध्ये दिवाळीनिमित्त येणारी शुभेच्छा पत्रे दिवाळीच्या आधी नागरिकांच्या हाती कशी पडतील, याची व्यवस्था केली आहे. रोजच्या लिफाफ्यातून, पत्रातून दिवाळीशी संबंधित शुभेच्छा पत्र, भेटवस्तू बाजूला काढून त्याच दिवशी ते संबंधितांच्या हाती कसे पडेल याचे नियोजन केले जात आहे.

टपाल विभागाने कात टाकली

भाऊबीजेला आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी पाठविण्यासाठी काहींनी ‘मनी ऑर्डर’चा पर्याय स्वीकारला आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार टपाल विभागानेही कात टाकत मनी ऑर्डरचे स्वरूप सध्या बदलले आहे. ‘इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर’चा पर्याय ग्राहकांना दिला असून एका दिवसात ती रक्कम समोरच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परराज्यातील किंवा दूरच्या मनी आर्डर २४ तासांत तसेच जिल्हा परिसर आणि जवळच्या जिल्ह्य़ात २४ तासांच्या आतच पैसे जमा होत असल्याने अनेकांची ‘इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरला’ पसंती मिळत आहे. जिल्ह्य़ातून ऑक्टोबर महिन्यात अडीच हजार लोकांनी मनी ऑर्डर सेवेचा लाभ घेतला. दुसरीकडे, महिला वर्गाकडून भावाच्या आवडीचे खाद्यपदार्थ, त्याला आवडणारी एखादी वस्तू किंवा अन्य काही सामान देण्यासाठी स्पीडपोस्ट, एक्स्प्रेस सेवा, पार्सल सेवेचा पर्याय निवडला असल्याचे टपाल विभागाचे साहाय्यक अधीक्षक पंकज कुलकर्णी यांनी सांगितले.