News Flash

यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींनी राज्यपाल हळवे

औद्योगिक धोरणाचे प्रणेते म्हणून यशवंतरावांनी केलेले कार्य देशाला ज्ञात असल्याचा उल्लेख केला.

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कलादालनास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी भेट दिली. समवेत कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे.

यशवंतराव चव्हाण यांनी सर्व क्षेत्रांत केलेल्या कार्याची महती गात असताना यशवंतरावांविषयक आठवणींनी हळवे झालेले सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे रूप सोमवारी येथे पाहावयास मिळाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या वतीने आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी पाटील यांनी यशवंतरावांचे प्रसंगावधान, कल्पकता, दूरदृष्टी व धोरणी स्वभावाचे अनेक पदर उलगडले.
यशवंतरावांनी सहकार, कृषी, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांत केलेल्या कार्याचा प्रचार व प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी मुक्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्र उपक्रमाचे पाटील यांनी कौतुक केले. या वेळी यशवंतरावांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जीवनपटच पाटील यांनी मांडला. यशवंतराव हे बहुजनांचे राज्य होण्यासाठी प्रयत्न करणारे नेते होते. सहकाराची मुहूर्तमेढ रुजवितानाच सत्तेची योग्य विभागणी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केली, असे त्यांनी नमूद केले. वेणूताई आजारी असताना त्यांनी यशवंतरावांच्या मांडीवर डोके ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. यशवंतरावांच्या मांडीवर डोके ठेवताच त्यांची प्राणज्योत मालवली. हा प्रसंग सांगताना पाटील यांना अश्रू आवरता आले नाहीत. भावनाविवश झालेल्या पाटील यांच्या डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या ते त्यांनाही कळले नाही. सकाळी ‘यशवंतराव चव्हाण यांचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात भाई वैद्य, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शंकरराव कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. कुलकर्णी यांनी ‘राजकारणातील सुसंस्कृत शब्दप्रभू’ असा यशवंतरावांचा उल्लेख केला. सर्वसामान्यांची नाळ जपणारे त्यांचे नेतृत्व होते, असे त्यांनी नमूद केले. भाई वैद्य यांनी कृषी, औद्योगिक धोरणाचे प्रणेते म्हणून यशवंतरावांनी केलेले कार्य देशाला ज्ञात असल्याचा उल्लेख केला. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी यशवंतरावांचे कार्य कलादालनाच्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मधुकर भावे यांनी समाजातील सर्व घटकांचा विकास साधून हित जपणारा आधारस्तंभ असे यशवंतरावांचे वर्णन केले. या वेळी चर्चासत्रात सहभागी लेखक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र’ या शोधनिबंधाच्या पुस्तकाचे प्रकाशन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. यशवंतराव चव्हाण कलादालनाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या संजय पाटील, मंगेश जानोरकर, वडनेरे आणि विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. अजगेकर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रारंभी पाटील यांनी मुक्त विद्यापीठाने उभारलेल्या यशवंतराव चव्हाण कलादालनास भेट दिली. प्रास्ताविक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल चिकेरूर यांनी केले. कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी आभार मानले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 2:41 am

Web Title: sikkim governor shriniwas patil remember yashwantrao chavan
टॅग : Yashwantrao Chavan
Next Stories
1 नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी न करण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय
2 राष्ट्र सेवा दलाचा आज अमृत महोत्सव मेळावा
3 गांधी ‘वध’ नव्हे, तर खूनच!
Just Now!
X