18 January 2019

News Flash

कुमारी मातांचे वाढते प्रमाण चिंताजनक

बहुतेक बाळांना अनाथाश्रमाचा आधार

|| चारुशीला कुलकर्णी

बहुतेक बाळांना अनाथाश्रमाचा आधार

काही वर्षांत जिल्ह्य़ात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आहे. यामागील कारणांचा शोध घेतला तर नकळत्या वयात जडलेले प्रेम, त्यातून निर्माण होणारे शारीरिक आकर्षण, यामुळे अल्पवयीन मुलांनी घर सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. या घटनांमुळे कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, होणाऱ्या बाळांना कुमारी माता सांभाळण्यास तयार नसल्याने बहुतांशी बाळांना अनाथाश्रमात दाखल केले जाते. काही बेवारस सोडली जातात. यामुळे वेगळाच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.

नकळत्या वयातील प्रेम प्रकरणावर अनेक चित्रपट आले. त्यातही ‘सैराट’ चित्रपटानंतर प्रेम हेच सर्वस्व असे मानत अनेक अल्पवयीन प्रेम प्रकरणात अडकत घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडल्याचे या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे निरीक्षण आहे. या चित्रपटानंतर अल्पवयीनांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे खुद्द पोलीस अधिकारी सांगतात. अशा प्रकारे दाखल होणाऱ्या प्रकरणांचे ‘सैराट’ नामकरण केले आहे. गायब झालेल्या मुला-मुलींचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान असते. त्यांच्या मित्र-मैत्रिणीकडून, कधी घरच्या मंडळीकडून मुला-मुलींच्या प्रेम प्रकरणाची आणि त्याला होणाऱ्या विरोधाची माहिती मिळते.  ग्रामीण भागात पालकांचा अशिक्षितपणा, तर शहरी भागात पालकांच्या उच्चविद्याविभूषितपणाचा फटका मुलांसह पालकांना बसतो. समाजमाध्यमांच्या साहाय्याने मुलांना हवी ती माहिती सहजपणे उपलब्ध होते. आपले कुतूहल शमविण्याचा ते प्रयत्न करतात. त्यातून गैरप्रकार घडतात. साधारणत: १२ ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुली या भूलथापांना बळी पडत सर्रास घर सोडतात. अचानक कधी पालक किंवा पोलिसांच्या तावडीत ते सापडतात. अशा वेळी पळवून नेणाऱ्या मुलावर मुलीचे कुटुंबीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करतात. पोलीस त्या मुलाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करतात. या सर्व प्रकारात काही मुली गरोदर असल्याचे जेव्हा समोर येते, तेव्हा पालक हबकून जातात.

या सर्व चक्रातून सुटका करून घेण्यासाठी ते अज्ञातस्थळी किंवा शासकीय महिला निवारा केंद्रात मुलीची रवानगी करतात. सरकारी रुग्णालयात कुमारी माता प्रसूत झाल्यावर तेथेच बाल हक्क संरक्षण समितीसमोर हे मूल नको असे सांगत अनाथ आश्रमाकडे ते दत्तक प्रक्रियेसाठी सुपूर्द केले जाते. काही वर्षांत कुमारी मातांचे प्रमाण वाढले असल्याचे आधाराश्रमचे अधिकारी राहुल जाधव सांगतात.

आकडेवारीच्या भाषेत सांगायचे, तर जिल्ह्य़ातील सहा ते १२ तसेच १२ ते १८ वयोगटासाठी असलेल्या अनाथाश्रमात कुमारी मातांच्या बाळांची संख्या अधिक आहे. दोन वर्षांत २५ हून अधिक बाळ कुमारी मातांकडून दाखल झाले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत सात बाळ दाखल झाल्याची माहिती जाधव यांनी दिली.

तीन वर्षांत ३२ बालके आधाराश्रमात दाखल

तीन वर्षांत कुमारी मातांकडून मेपर्यंत ३२ बालके आधाराश्रमात दाखल झाली. वेगवेगळ्या ठिकाणी, पालकांनी बेवारस स्थितीत सोडून दिलेली शून्य ते दोन महिन्यांची ४४ बालके आधाराश्रमात दाखल झाली आहेत. जवळपास हे प्रमाण सारखे असून कुमारी मातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कुमारी मातांकडून आलेल्या बालकांपैकी २५ बालकांना दत्तक प्रक्रियेचा अवलंब करत हक्काचा निवारा मिळवून देण्यात आला आहे.    – राहुल जाधव, समन्वयक, आधाराश्रम

समुपदेशनात अडचणी

पळून गेलेल्या मुला-मुलींना जेव्हा बाल कल्याण समितीसमोर आणले जाते, तेव्हा बऱ्याचदा मुली पालकांसोबत घरी जाण्यास तयार नसतात. पालकांचे एकमेकांसोबत असलेले संबंध, घरातील कौटुंबिक ताण यापासून दूर जात ज्याच्यावर आपण प्रेम केले, त्याला दोषमुक्त करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. केवळ जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊ द्या, असा धोशा या मुली लावतात. तेव्हा त्यांचे समुपदेशन कसे करायचे, असा प्रश्न समिती सदस्यांना पडतो. जिल्ह्य़ात विशेषत: ग्रामीण भागात भ्रमणध्वनी, इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मुला-मुलींचे भरकटण्याचे प्रमाण वाढले आहे.    – शुभांगी बेलगांवकर (बाल कल्याण समिती)

First Published on June 6, 2018 12:47 am

Web Title: single mother anath ashram