बंगळुरूच्या धर्तीवर, नाशिक शहरातील सिग्नलवर पादचाऱ्यांसाठी ‘सायरन’ बसविणे आणि आवश्यक त्या चौकांमध्ये तातडीने सिग्नल उभारण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेतील बैठकीत घेण्यात आला. पालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील वाहतुकीचा आढावा घेण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, एसटी महामंडळ या विभागांसह नाशिक फर्स्ट या वाहतुकीवर काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. शहरातील वाहतुकीचा अभ्यास सल्लागार संस्थेमार्फत सुरू आहे. संबंधितांच्या सर्वेक्षणाची माहिती सादर करण्यात आली. वाहतूक नियोजनाच्या पुढील कामांसाठी महापालिकेत ‘मोबिलिटी’ कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात महापालिका, शहर वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन, एस. टी. महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, बीएसएनएल, वाहतुकीशी संबंधित सेवाभावी संस्था यांच्या प्रतिनिधींचा समावेश राहील असे कृष्णा यांनी नमूद केले. शहरात पहिल्या टप्प्यात वाहनतळ, सिग्नल व्यवस्था व पादचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्याबाबत व त्यासंबंधीच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियोजन तीन टप्प्यांत करण्यात येईल. पुढील पाच ते दहा वर्षांतील स्थिती आणि अंतिम टप्प्यात पुढील २० वर्षांच्या कालावधीतील वाहतुकीचे नियोजन करण्यात येईल. बंगळुरू शहरात सिग्नलवर पादचाऱ्यांसाठी सायरनची व्यवस्था आहे. तशीच व्यवस्था नाशिकमध्येही काही सिग्नलवर करण्याबाबत चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली. तसेच अनेक वर्दळीच्या चौकात आजही सिग्नल व्यवस्था कार्यान्वित नाही. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने ही व्यवस्था सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.