शब्द कालबाह्य होत असल्याची सई परांजपे यांची खंत
नाशिक : मराठी भाषेविषयी परिस्थिती बिकट आहे. साधे साधे शब्द कालबाह््य होत आहेत. मराठी भाषा दिन एक दिवसापुरता साजरा करण्याऐवजी वर्षभर साजरा केला तरच मराठी भाषेला संजीवनी प्राप्त होईल, असा आशावाद प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांनी व्यक्त केला.

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा ऑनलाइन झाला. या सोहळ्यात चित्रपट क्षेत्रातील कार्याबद्दल सई परांजपे यांना गौरविण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी मराठी भाषेसाठी काय करता येणे शक्य आहे, ते सांगितले. परांजपे यांच्यासह या कार्यक्र मात गौरी सावंत (लोकसेवा), डॉ. माधव गाडगीळ (विज्ञान), भगवान रामपुरे (शिल्प), दर्शना जव्हेरी (नृत्य) आणि काका पवार (क्रीडा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, सन्मानपत्र असे आहे.

करोना संकटामुळे १० मार्च २०२० रोजी होऊ न शकलेला गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. एक वर्षाआड गोदावरी गौरव पुरस्कार दिले जातात. यावेळी सर्वच पुरस्कारार्थींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  गौरी सावंत यांनी लिंग समानतेविषयी मत मांडताना समाजाने आहे तसे सर्वांना स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. आयुष्यात येणाऱ्या अनुभवांमुळे कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचा अर्थ आता समजल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. माधव गाडगीळ यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांची वैशिष्ट्ये मांडली. कुसुमाग्रजांच्या कवितांमधून निसर्गाचा आविष्कार अनुभवता येतो. त्यांच्या कवितांनी स्फूर्ती दिली, असे नमूद केले. शिल्पकार रामपुरे यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन करत वेगवेगळे पैलू उलगडले. दर्शना जव्हेरी यांनी नृत्य कलेत केलेल्या प्रयोगांची माहिती दिली. काका पवार यांनी कुस्तीसारख्या रांगड्या खेळाला प्रतिष्ठानने पुरस्काराच्या माध्यमातून न्याय दिल्याची भावना व्यक्त केली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगांवकर यांनी कुसुमाग्रजांनी जीवनाचा आनंद घेण्यास शिकवल्याचे सांगितले. आज जीवनातून कला हद्दपार होत आहे. मुलांनी मोठ्या पगाराची नोकरी करावी हे पालकांचे स्वप्न असते. मात्र गोदा गौरवचे सर्व पुरस्कारर्थी हे जगण्याचा आनंद घेत आहेत. ज्या क्षेत्रांना कोणी स्पर्श के ला नाही अशा क्षेत्रात ते काम करत आहेत. ही आवड आजच्या पिढीत यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.