पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार

नाशिक : मेच्या पूर्वार्धात दुष्काळाने भयावह स्वरूप धारण केले असून धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या केवळ १७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. सहा धरणे कोरडी ठणठणीत झाली असून आणखी सहा धरणांची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ३२ टक्के जलसाठा असून पाणीपुरवठय़ात कपातीची वेळ अद्याप आली नसली तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे.

सद्य:स्थितीत २०० गावे आणि ६७९ वाडय़ांना २६३ टँकरने पाणी द्यावे लागत असून काही धरणांतील जलसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने पुढील काळात ही स्थिती अधिकच बिकट होणार आहे. जिल्ह्य़ात लहान-मोठी एकूण २४ धरणे असून त्यातील पुणेगाव, भावली, नांदूरमध्यमेश्वर, भोजापूर, नागासाक्या आणि माणिकपुंज ही सहा धरणे पूर्णत: कोरडी पडली आहेत. याव्यतिरिक्त आळंदी, पालखेड, वाघाड, कडवा, तिसगाव, मुकणे या धरणांमध्ये सध्या एक ते १० टक्क्यांच्या दरम्यान जलसाठा आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १७९५ दशलक्ष घनफूट (३२ टक्के) जलसाठा आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना शहराला मात्र त्याची झळ अद्याप बसलेली नसल्याने मे महिन्याच्या मध्यापर्यंत कपातीची गरज भासलेली नाही. पाऊस लांबल्यास त्या अनुषंगाने विचार करणे क्रमप्राप्त ठरेल. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून महापालिकेने अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. याच समूहातील काश्यपीमध्ये ३१९ दशलक्ष घनफूट (१७ टक्के), गौतमी गोदावरीमध्ये २३६ (१३) जलसाठा आहे.

आळंदीमध्ये ५५ दशलक्ष घनफूट (सहा), पालखेडमध्ये २९ (चार), करंजवण ९३८ (१७), वाघाड ४० (दोन), ओझरखेड २५० (१२), पुणेगाव (शून्य), तिसगाव पाच (एक), दारणा १५१५ (२१), भावली चार (शून्य), मुकणे ७४० (१०), वालदेवी १७९ (१६), कडवा २० (एक), नांदूरमध्यमेश्वर (शून्य), भोजापूर (शून्य), चणकापूर ४६६ (१९), हरणबारी ३३६ (२९), केळझर १२६ (२२), गिरणा ३३१७ (१८), पुनद ७२७ (५६), माणिकपुंज (शून्य) असा जलसाठा राहिल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

गतवर्षीपेक्षा जलसाठा नऊ टक्क्यांनी कमी

सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील सर्व धरणांमध्ये ११ हजार ९७ दशलक्ष घनफूट अर्थात १७ टक्के जलसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण नऊ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी याच सुमारास धरणांमध्ये १७ हजार २९३ दशलक्ष घनफूट अर्थात २६ टक्के जलसाठा होता. यंदा हे प्रमाण सहा हजार १९६ दशलक्ष घनफूटने कमी आहे. यंदा सहा धरणे कोरडी पडली असून आणखी सहा धरणे कोरडी होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षी मेच्या पूर्वार्धात केवळ माणिकपुंज हे एकमेव धरण कोरडे झाले होते. उर्वरित सर्व धरणांमध्ये काही अंशी जलसाठा होता. या वर्षी हे चित्र पूर्णपणे उलट आहे.