News Flash

नाशिक जिल्ह्यत पावसाचे सहा बळी

गोदावरीच्या महापुराने कित्येक कोटीचे नुकसान

गोदावरीच्या महापुराने कित्येक कोटीचे नुकसान

अतिवृष्टीमुळे महापुराला तोंड द्याव्या लागलेल्या नाशिक जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास हातभार लागला. जिल्ह्यात पावसाचे सहा बळी गेले आहेत. नदीकाठावरील दुकाने, घरे व रस्ते सर्व परिसर चिखलमय झाला. पावसामुळे कोटय़वधींचे नुकसान झाले. धरणांमधील विसर्ग कमी झाल्यामुळे आदल्या दिवशी धोक्याची पातळी ओलांडणाऱ्या गोदावरीसह अन्य नद्यांचा प्रवाह बराचसा कमी झाला.

मागील दहा वर्षांत झाला नव्हता असा चोवीस तासांत २०४ मिलिमीटर विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे तुडुंब भरलेल्या धरणांमधून पाणी सोडणे भाग पडले. गोदावरी व दारणासह जवळपास सर्वच लहान-मोठय़ा नद्यांना पूर आला. गोदावरी काठालगतचा परिसर आणि शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली बुडाले होते. मंगळवारी मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नागरिकांसह शासकीय यंत्रणांनाही दिलासा मिळाला.

नदीकाठालगतची घरे, दुकाने व सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होते. शहरातील अनेक रस्त्यांना मोठी भगदाडे पडली. सर्वत्र स्वच्छतेचे काम सुरू असल्याने बाजारपेठेतील व्यवहार दुसऱ्या दिवशीही सुरळीत झाले नाही. पावसाने जिल्ह्यात सहा जणांचा बळी घेतला. इगतपुरी तालुक्यात वाहून जाणारे घरातील साहित्य वाचविताना बबन गंगा ठाकरे (४५) हे वाकी धरणात बुडाले. त्यांचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. दिंडोरी तालुक्यात चार तर सिन्नर तालुक्यात एक असा पाच जणांचाही वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला.

गोदावरीच्या पुरात अडकलेल्या चांदोरी व सायखेडा परिसरातून ‘एनडीआरएफ’च्या पथकाने ७७ जणांची सुखरूपपणे सुटका केली. त्यात महिला व बालिकांसह एका तीन दिवसीय बाळाचाही समावेश आहे. जिल्ह्यातील गंगापूर, पालखेड, करंजवण, वाघाड, पुणेगाव, दारणा, भावली व वालदेवी या धरणांमधून सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याचा विसर्ग सुरू आहे; परंतु दारणा वगळता इतर धरणांमधील हा विसर्ग कमी झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:25 am

Web Title: six death by heavy rain in nashik
Next Stories
1 पंचवटी अमरधाममधील यंत्रणेवर परिणाम
2 नाशिकमध्ये हाहाकार
3 ग्रामीण भागांत अनेक पूल पाण्याखाली
Just Now!
X