जिल्ह्य़ात सहा रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. त्यापैकी गोरेवाडी येथील १० कोटी ९२ लाख रुपये खर्चाच्या उड्डाणपुलास यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात मुंबईवरून उत्तर भारतात जाणारा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. या मार्गावरून मध्य रेल्वे तसेच दक्षिण रेल्वेच्या गाडय़ांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असते. हा रेल्वेमार्ग नाशिक शहराच्या सुमारे ७० टक्के निवासी भागातून जात असल्याने स्थानिक जनता तसेच जिल्ह्य़ातील रस्ता वाहतुकीस मोठय़ा प्रमाणावर रेल्वेरूळ ओलांडण्यासाठी थांबावे लागते. रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच व्यस्त रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार महाराष्ट्रात १८ रेल्वे उड्डाणपुलांना मान्यता देण्यात आली. गोरेवाडी येथे उड्डाणपुलास आधीच मंजुरी मिळाली असली तरी काही रेल्वे उड्डाणपुलांचा विचार झाला नसल्याचे गोडसे यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याची तत्काळ दखल घेत मंत्र्यांनी बांधकाम विभागास याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्यानुसार भगूर, वंजारवाडी, बेलतगव्हाण, संसरी, घोटी येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहेत. या सहा रेल्वे उड्डाणपुलांमुळे त्या त्या परिसरातील सर्वाचीच सोय होणार आहे. संसरी येथे एका ठिकाणी मार्ग सरळ नसल्याने एल आकारात वळण घेऊन मार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. संसरी येथे उड्डाणपुलाची नितांत आवश्यकता असल्याने या ठिकाणची नोंदही प्रस्तावात घेण्यात आली आहे.