उन्हाळ्यात गंगापूर धरण तळ गाठण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले की, दरवर्षी गाळ काढण्याचा उपक्रम उत्साहात सुरू होतो. यंदाचे तीव्र दुष्काळी वर्षदेखील त्यास अपवाद ठरले नाही. सोमवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यास सुरुवात झाली. दरवर्षी थाटामाटात सुरू होणारा हा उपक्रम काही दिवसांनंतर थंडावतो, असा आजवरचा अनुभव आहे. गाळ साचल्यामुळे धरणाची पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. आसपासच्या शेतात टाकण्यासाठी मोफत स्वरूपात हा गाळ नेण्याचे आवाहन केले जाते, परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस प्रतिसाद मिळतो. नंतर त्यातील उत्साह ओसरतो. यंदा त्यापेक्षा काही वेगळे घडणार काय, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर हे अतिशय महत्त्वाचे धरण. पावसासोबत वाहत येणाऱ्या गाळामुळे या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, पावसाळ्यात मूळ क्षमतेइतका जलसाठा करणे अवघड झाले आहे. राज्यातील अनेक धरणांना कमी-अधिक प्रमाणात गाळाच्या या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात गंगापूर धरणाची क्षमता जवळपास २० टक्क्यांनी कमी झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून गाळ काढण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला जात आहे. धरणात साठलेला गाळ काढणे ही अवघड आणि तितकीच खर्चीक बाब. त्यामुळे उन्हाळ्यात शक्य तितक्या प्रमाणात गाळ काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या हस्ते गंगावऱ्हे गावच्या परिसरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरुवात झाली.
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने गाळ काढण्यासाठी जेसीबी व अन्य सामग्रीही तत्काळ उपलब्ध करून दिल्याचे कुशवाह यांनी नमूद केले. जितक्या अधिक प्रमाणात गाळ काढला जाईल, तितक्या प्रमाणात धरणाची साठवण क्षमता वाढणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतीसाठी उपयुक्त हा गाळ शेतकऱ्यांना मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. केवळ वाहतुकीचा खर्च त्यांना करावा लागेल. व्यावसायिक उपयोगासाठी मात्र मोफत गाळ नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. आवश्यकतेनुसार यंत्रणेत वाढ केली जाईल. शेतकऱ्यांनी गाळ वाहून नेण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. गंगापूर धरण परिसरात आवश्यक त्याच ठिकाणी वीज भारनियमन केले जाईल असेही त्यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी धरण परिसरातील ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन दिले. मागील सहा ते सात वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात या धरणातील गाळ काढण्यासाठी मोहीम राबविली जाते. काही दिवस शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळतो. पण नंतर हा गाळ वाहतुकीचा खर्च करून कोणी शेतात नेण्यास तयार होत नाही, असा अनुभव आहे. व्यावसायिक कारणासाठी गाळ मोफत दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. वास्तविक, धरणातून गाळ बाहेर काढून तो कुठे टाकावा, हा खरा प्रश्न आहे. कारण, अनेक शेतकरी तो शेतात टाकण्यास उत्सुक नसतात. पाटबंधारे विभाग गाळाचा उपसा करण्यास तयार असले तरी त्यांच्यासमोर त्याची विल्हेवाट कुठे व कशी लावावी ही डोकेदुखी आहे. या एकंदर स्थितीत गाळाच्या गर्तेतून गंगापूर कधी बाहेर पडणार, हा प्रश्न अनुत्तरित राहण्याची शक्यता आहे.