एचपीटीच्या पत्रकारिता विभागाचे सर्वेक्षण; वाहतूक सक्षम नसल्याचे ५८ टक्के मत

सिंहस्थानंतर प्रमुख रस्ते चकचकीत दिसत असले तरी खड्डेमय शहर ही ओळख कायम आहे. अतिक्रमण व अस्वच्छतेमुळे अनेक पदपथ पादचाऱ्यांसाठी निरुपयोगी ठरले. शहरात झोपडपट्टय़ा वाढण्यामागे राजकीय सोय हे एक कारण आहे. दुष्काळाचे चटके सहन करूनही पाण्याचा अपव्यय कमी झालेला नाही. त्यास महापालिका आणि शहरवासीयही जबाबदार आहेत. मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्यास पालिका अपयशी ठरली.. हे निष्कर्ष आहेत, ‘स्मार्ट सिटी’ म्हणून नावारूपास आणावयाच्या आणि महापालिका निवडणुकीच्या उंबरठय़ावर उभ्या असणाऱ्या नाशिकच्या सर्वेक्षणातील.

हंप्राठा कला व रायक्ष विज्ञान महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शहरात सलग दोन महिने पाहणी करण्यात आली. पालिकेच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिकरोड अशा सहा विभागांतील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. त्या अंतर्गत साडेचार हजार नागरिकांकडून प्रश्नावलीद्वारे विविध मुद्दय़ांवर मते जाणून घेण्यात आली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, डॉ. हेमंत राजगुरू, ज्येष्ठ पत्रकार संजय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबींची माहिती भार्गवे यांनी दिली.

वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिक गणले जात असले तरी अनेक मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी आहेत. खड्डेमय रस्ते ही मोठी डोकेदुखी. पण पालिका त्याकडे कानाडोळा करते असे बहुतेकांना वाटते. अनेक पदपथ अतिक्रमण, अस्वच्छता, जनावरांचा राबता आदी कारणांनी वापरता येत नाही, असे ३२ टक्के नागरिकांचे मत आहे. अंतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याचे ५८ टक्के लोकांना वाटते. म्हणजे, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने बहुमजली वाहनतळांचा पर्याय अधिक्याने सुचविला गेला. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ सेवा सोयीची वाटते. शहरात ‘हॉकर्स झोन’ अस्तित्वात आल्यानंतर अतिक्रमणाचा प्रश्न निकाली लागेल, अशी अनेकांना आशा आहे. भटक्या जनावरांचा त्रास कमी-अधिक प्रमाणात सर्वाना सहन करावा लागतो. सर्वच भागांत ही स्थिती असली तरी त्यांचा बंदोबस्त करण्यात पालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याचा ठपका बहुतेकांनी ठेवला आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे झोपडपट्टय़ांची संख्या वाढत आहे. परवडणारी घरे उपलब्ध होत नसल्याने झोपडपट्टय़ा वाढतात आणि रोजगारीचा प्रश्नही त्यामागे प्रमुख कारण असल्याचे पाहणीत समोर आले. पालिकेचे ‘मोबाइल अ‍ॅप’ वापरणाऱ्यांचे प्रमाण तुरळक आहे. पालिका सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुरेसे प्रयत्न करत नाही. दुसरीकडे घंटागाडी व्यवस्थेबद्दल नागरिक समाधानी आहेत. खासगी वैद्यकीय सेवेच्या तुलनेत पालिकेची वैद्यकीय सुविधा चांगली नसल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे. आरोग्य आणि पर्यावरणासाठी नव्याने उद्यानांची गरजही सर्वेक्षणात मांडण्यात आली आहे.

एकवेळच्या पाणीपुरवठय़ास अनुकूलता

दुष्काळामुळे गत वर्षांत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. या स्थितीत पाण्याचा अपव्यय कमी झाला नाही. जलवाहिन्यांतील गळती, नळाच्या तोटय़ा सुरू ठेवणे, पिण्याच्या पाण्याचा वाहन व बगिचासाठी वापर, तुडुंब होऊन टाकीतून पाणी वाहणे, ही त्याची कारणे नागरिक सांगतात. सध्या अनेक भागांत दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो. सर्व भागांत एक वेळ मुबलक स्वरूपात पाणीपुरवठा करण्यास बहुतेकांनी अनुकूलता दर्शविली आहे.

नागरिकांच्या अपेक्षा

  • रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत
  • अतिक्रमण हटवा, पदपथ चांगले ठेवा
  • पथदीपांची प्रकाशक्षमता वाढवून देखभाल करावी
  • नियमित स्वच्छता व डास निर्मूलन
  • उघडय़ावरील मांस विक्रीला प्रतिबंध
  • गटार व्यवस्थेत सुधारणा
  • वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबर दंड
  • इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्यावाढ
  • सीसी टीव्ही यंत्रणा