17 December 2017

News Flash

लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत स्थान

काही दिवसात भाजप आमदार व नगरसेवकाला अडचणीत आणणारे प्रकरण समोर आले.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: October 13, 2017 12:53 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

भाजपमध्ये अंतर्गत दुहीचा संशय

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरकुलांचे वाटप करताना प्रशासनाने सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना लाभार्थीच्या यादीत स्थान दिल्याच्या तक्रारीवरून भाजप-काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असले तरी त्यामागे भाजपमधील काही घटकांनी फुस लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रृत आहे. काही दिवसांपूर्वी महिलांसाठी प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेच्या मुद्यावरून उभय गटातील वाद चव्हाटय़ावर आले होते. त्यानंतर काही दिवसात भाजप आमदार व नगरसेवकाला अडचणीत आणणारे प्रकरण समोर आले. या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध नसला तरी लाभार्थी यादीचे प्रकरण बाहेर काढण्यामागे भाजपमधील काही घटक कार्यरत असल्याची शंका काही पदाधिकारी व नगरसेवक व्यक्त करीत आहे.

महापालिकेच्या घरकूल योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना दीडशे बनावट लाभार्थी दाखविले गेल्याची तक्रार काँग्रेसने केली. शिवाजी वाडी, भारतनगर, वडाळारोड या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू या नावाने घरकूल योजना राबविली गेली. त्या अंतर्गत ६२० घरे २०१२ मध्ये तयार करण्यात आली.

ही घरे परिसरातील गोरगरीबांना ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाहीत अशा गरजु व्यक्ती तसेच १०० फूटी अतिक्रमणात तोडण्यात आलेल्या घरांमधील कुटुंबांना देण्यात येणार होती. तत्कालीन स्थानिक नगरसेवकांनी संबंधितांना उर्दु व मराठी शाळेच्या आवारात स्थलांतरीत केले. १०० फूट रस्त्याच्या अतिक्रमणात बेघर झालेल्या ३० कुटुंबियांऐवजी १८० लोक बेघर झाल्याचे चुकीचे दाखवत त्यांना घरकुलात स्थान दिले गेल्याची तक्रार डॉ. हेमलता पाटील यांनी केली. या यादीत भाजप नगरसेवकांशी संबंधित नातेवाईक तसेच माजी नगरसेवकांचे सासू व भाऊ यांचा समावेश करण्यात आला.

घरकुल योजनेसाठी भाजप आमदाराच्या घरामध्ये संबंधित अधिकारी व स्थानिकांना बोलावून यादीचे वाचन झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भाजपने काँग्रेसचे आरोप फेटाळत ज्या नगरसेवकाच्या नातेवाईकांना यादीत स्थान मिळाले ते नियमानुसार असल्याचा दावा केला. त्याचे पुरावे संबंधिताने गुरूवारी पालिका आयुक्तांकडे सादर केले. याआधी तत्कालीन पालिका आयुक्तांनी आपल्या कागदपत्रांची पूर्ण छाननी केली होती. तेव्हा कोणताही दोष आढळला नसताना आता जाणीवपूर्वक या विषयाचे राजकारण केले जात असल्याचे संबंधिताचे म्हणणे आहे.

भाजप आमदार व नगरसेवकाला काँग्रेसने लक्ष्य केले असले तरी ज्यांच्यावर आरोप झाले, ती मंडळी वगळता भाजपमधून त्यांच्या बचावासाठी कोणी पुढे आले नाही. भाजपच्या महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांनी बाळगलेले मौन पक्षांतर्गत बेदीलीचे निदर्शक असल्याचे कार्यकर्ते सांगतात. महापालिका निवडणुकीपासून भाजपमध्ये नवा-जुना वाद सुरू आहे. त्याचे पडसाद अधुनमधून उमटतात. महिलांसाठी प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेवरून आ. फरांदे आणि गिते गटात धुसफूस आहे. भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहाशेजारील जागेला गिते गटाने विरोध केला होता. नंतर वडाळा भागातील जागेचा प्रस्ताव नाकारत भाजप नगरसेवकांनी तो टाकळी येथील भूखंडावर स्थलांतरीत केला. ही बाब समजल्यावर फरांदे यांनी पालिकेत दाखल होत प्रशासनाला फैलावर धरले होते. त्यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी काढता पाय घेतला.

भाजपमधील सुप्त संघर्ष वारंवार चव्हाटय़ावर येत असताना घरकूल लाभार्थीचा विषय समोर आला. त्यामागे पक्षांतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा भाजपच्या गोटात होत आहे.

या संदर्भात शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

First Published on October 13, 2017 12:53 am

Web Title: slum rehabilitation scheme beneficiaries of family home bjp