News Flash

स्थानिक उद्योग उभारणीत लघू उद्योजकांनी सहभागी व्हावे

समाज व्यवस्थेला उभारी देताना नवे उद्योग कसे निर्माण होतील यासाठी उद्योग व्यवस्था काम करत आहे.

नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात उद्योजकांना मार्गदर्शन करताना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे आवाहन

‘मेक इन नाशिक’ असो वा स्थानिक उद्योगांना उभारी यावी यासाठी सुरू करण्यात आलेला ‘व्हेंडर रजिस्ट्रेशन’ उपक्रम असो. त्यात अधिकाधिक लघू उद्योजकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. सहभाग जेवढा अधिक तेवढी स्पर्धा तीव्र. स्पर्धा तीव्र असली की गुणवत्ता तसेच परिपूर्ण उत्पादन बाजारात येते. ज्याची आज गरज आहे. त्या दृष्टीने उद्योजकांनी आपले कौशल्य आजमावत या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केले.

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा)च्यावतीने मेक इन नाशिक उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांकडून व्हेंडर रजिस्ट्रेशन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरूवात गीते व खा. हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी गीते यांनी राष्ट्र विकासात कृषी आणि उद्योग महत्वाचे असल्याचे नमूद केले. उद्योग वाढीसाठी आमचे प्रयत्न सुरू असून बेरोजगारी हटवत रोजगाराचे नवे पर्याय देण्याचा प्रयत्न आहे.

समाज व्यवस्थेला उभारी देताना नवे उद्योग कसे निर्माण होतील यासाठी उद्योग व्यवस्था काम करत आहे. हे काम करतांना सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना मंत्रालयीन स्तरावरून कागदपत्र, करप्रणाली किंवा अन्य कारणातून होणारा हस्तक्षेप थांबवत कायद्यात काही दुरूस्ती केल्या आहेत. जेणेकरून उद्योगांना स्वतंत्रपणे काम करता येईल असे गीते यांनी सांगितले. देशाच्या विकासात मोठे उद्योग जसे महत्वपूर्ण ठरतात, तसाच लघू उद्योग किंवा त्याहून लहान उद्योगही देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. विकासाच्या दृष्टीने बदल होत असून ते स्वीकारणे गरजेचे आहे. सार्वजनिक उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

खा. गोडसे यांनी उद्योग वाढीसाठी लोकप्रतिनिधी आणि उद्योग क्षेत्राने एकत्रित काम केल्यास विकास सहजसाध्य आहे. मेक  इन नाशिक उपक्रम यशस्वितेसाठी नाशिकच्या सर्व संघटना एकत्रित आल्या. वेगवेगळे प्रकल्प समोर आले. यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. मेक इन नाशिक नंतर उद्योग वाढीसाठी असलेले अनुकूल वातावरण समोर आले आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हा वाहतुकीच्या बाबतीत सर्वच स्तरावर जोडलेला आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून व्हेंडर रजिस्ट्रेशन अंतर्गत विकासाची मुहूर्तमेढ रोवली जात असल्यचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेक इन नाशिकची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन केले. यावेळी मधुकर ब्राह्मणकर, एच. एस. बॅनर्जी, श्रीकांत बच्छाव आदी निमाचे पदाधिकारी उपस्थित होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत अर्थ मूव्हर्स, गोवा शीपयार्ड, गार्डन ब्रीजशिप विंडोज, हिंदुस्थान एरोनॅटिकल लिमिटेड, मिश्रधातू निगम, जहाज बांधणी अशा आठ सार्वजनिक उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमास हजेरी लावली आहे. दोन दिवसात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

१५ दिवसांत विमान सेवा सुरू

खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नामुळे नाशिकची विमानसेवा अर्थात उडान उपक्रमाचा प्रश्न मार्गी लागल्याचे अनंत गीते यांनी सांगितले. उडान प्रकल्प का रखडला याचा पाठपुरावा करत त्यासाठी रस्त्यावर उतरत त्यांनी हा प्रश्न तडीस नेला. यामुळे पुढच्या १५ दिवसात एअर डेक्कनची विमानसेवा सुरू होईल. लोकप्रतिनिधी असा असावा असे प्रशस्तिपत्रक गीते यांनी दिले. केंद्र सरकारच्या उपक्रमांना राज्य सरकारने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2017 3:16 am

Web Title: small entrepreneurs to participate in local industry establishment
टॅग : Anant Geete
Next Stories
1 घोषणांचे ओझे, फलनिष्पत्तीची समस्या कायम
2 नैराश्यामुळे सेनेकडून टीका
3 भाजप हा रावण व कपटी शत्रू – संजय राऊत
Just Now!
X