स्मार्ट सिटी’ अभियानातंर्गत ‘सायकल शेअरिंग’ या अनोख्या प्रकल्पाचा नाशिक शहरात लवकरच श्रीगणेशा होणार आहे. महानगरपालिका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या सहकार्याने शहरातील गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकपासून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण टीसीएसच्या टीमने महापौर रंजना भानसी यांच्यासमोर सादरीकरण केले असून लवकरच हा प्रकल्प कार्यन्वित होणार आहे.

नाशिकमध्ये स्थापन झालेल्या टीसीएस इनोव्हेन्शन सेंटरसह नाशिक महापालिकेने करारनामा केला असून टीसीएसमधील संशोधकांनी विकसित केलेले समाजोपयोगी प्रकल्प नाशिक महापालिका राबविणार आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाअंतर्गत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकजवळ सायकल स्टेशन उभारले जाणार आहेत. सायकल शेअरिंग प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी करणाऱ्यांना स्वॅप कार्ड दिले जाईल.

प्रतितासाप्रमाणे काही शुल्क आकारून सायकलींचा आस्वाद नाशिककरांना घेता येणार आहे. या सायकलींचा वापर नागरिकांना मैदानापुरता करता येणार आहे. या प्रकल्पाच्या सुरवातीला सहा सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सायकल चोरीस जाऊ नये यासाठी या सायकलवर जीपीएस ट्रॅकिंग बसविण्यात आली आहे. ‘सायकल शेअरिंग’ प्रकल्पामुळे नाशिककरांना शरीर स्वास्थ्यासाठी ग्रीन जीमच्या जोडीला या सायकलचा देखील वापर करता येणार आहे. गोल्फ क्लबवरील या मैदानानंतर या प्रकल्पाचा विस्तार शहरात वाढणार असून शहरातील विविध पर्यटनस्थळी देखील ही अनोखी संकल्पना राबवली जाणार आहे.