पालिका अधिकाऱ्यांमध्ये धास्ती; तक्रारीची दखल न घेतल्यास कारणे दाखवा नोटीस

ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली की, तिचे सात दिवसांत निराकरण व्हायला हवे. चोवीस तासात अधिकाऱ्याने तक्रारीची दखलही न घेतल्यास ती आपोआप वरिष्ठांकडे वर्ग होईल. पण, दुर्लक्ष करणाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून. तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदाराला प्रतिक्रिया नोंदविता येईल. समाधानी नसल्यास पुन्हा तिची दखल घेतली जाईल. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे नागरिकच मूल्यमापन करतील. कोणत्या विभागाकडे किती तक्रारी प्राप्त झाल्या, त्यावरील कार्यवाही, आदींवर थेट प्रशासन प्रमुखांचे लक्ष राहणार आहे. महानगरपालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीत अनोखे बदल करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांचा सहभाग वाढविण्यासोबत कारभाराला पारदर्शकेची जोड दिली आहे. या प्रणालीने मुदतीत तक्रारींचा निपटारा करण्याचे दायित्व आल्याने अधिकारी धास्तावले आहे.

महानगरपालिकेची ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली आधीपासून अस्तित्वात आहे. ऑनलाईन कार्यप्रणाली, भ्रमणध्वनी अ‍ॅप याद्वारे वार्षिक २५ ते ३० हजार तक्रारी पालिकेकडे प्राप्त होतात. तक्रार निवारण कार्यप्रणालीत अधिक सुलभता, अचुकता येऊन तक्रारींचे निवारण परिणामकारक होण्यासाठी या प्रणालीत अनेक बदल करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. कोणत्या विभागाकडे तक्रार करावी, हे नागरिकांना अनेकदा माहीत नसते. नव्या प्रणालीत हा अडसर दूर करण्यात आला आहे.

अतिशय सहज, सुलभपणे नागरिक तक्रार करू शकतील. नवीन प्रणालीत त्याकरिता एकदा नोंदणी करावी लागेल. तक्रार आपोआप संबंधित विभागाकडे वर्ग होईल. शिवाय, तक्रारदारास आपल्या तक्रारींची माहिती ऑनलाईन जतन करता येईल.

आधीच्या प्रणालीत तक्रार निराकरणासाठी संबंधित कर्मचाऱ्याकडे वर्ग होत असे. नवीन प्रणालीत ही जबाबदारी विभागीय अधिकारी, संबंधित खातेप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी कालावधी निश्चित झाल्यामुळे अधिकाऱ्यांना मुदतीत निवारण करावे लागणार आहे. तक्रारीचे निराकरण करून ती बंद केल्यानंतर नागरिक जेव्हा दुसरी तक्रार नोंदवतील, तेव्हा आधीच्या तक्रारींसाठी प्रतिक्रिया देण्याची सुविधा नव्या प्रणालीत आहे. या आधारे तक्रार निवारण करणारा विभाग, अधिकाऱ्याला मानांकन प्राप्त होईल. त्या आढाव्याद्वारे संबंधित अधिकाऱ्याची कामगिरी कशी आहे, याची स्पष्टता होईल. या प्रणालीद्वारे प्रशासकीयदृष्टय़ा तक्रारी आणि कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

घंटागाडीची आगाऊ माहिती मिळणार

महापालिकेचे ‘स्मार्ट नाशिक’ हे भ्रमणध्वनी अ‍ॅप आता ‘एनएमसी इ कनेक्ट’ या नावाने ओळखले जाईल. त्याचे अद्ययावत रुप ‘प्ले स्टोअर’वर लवकरच उपलब्ध होईल. त्यात बदल झालेल्या नवीन तक्रार निवारण कार्यप्रणालीचा समावेश आहे. याद्वारे नागरिकांना अत्यल्प काळात तक्रार करता येईल. प्रतिक्रिया, मानांकन आदी सुविधा त्यात आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांनी आपल्या भ्रमणध्वनीवर एकदा घराच्या ठिकाणाची नोंद केल्यावर घंटागाडी त्यांच्या घराजवळ येण्याच्या दहा मिनिटे आधी त्यांना सूचना मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना घंटागाडीकरीता ताटकळत थांबण्याची गज भासणार नाही. महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण प्रगतीपथावर आहे.