दोन तास दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांचा निषेध

कित्येक महिने रखडलेल्या स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे  वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असतांना आता सीबीएस आणि मेहेर चौकातील र्निबधामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील बाजारपेठा सणासुदीच्या काळात संकटात सापडल्या आहेत. स्मार्ट रस्त्याचे रखडलेले काम दिवाळीआधी पूर्ण करा, या मागणीसाठी सोमवारी शहरातील रविवार कारंजा, अशोक स्तंभ आणि महात्मा गांधी रोडसह मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत निषेध नोंदविला. याबाबत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, या बंदची पूर्वकल्पना नसल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ परिसरात स्मार्ट रस्त्याचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे. यामुळे अशोक स्तंभ रस्त्यावरील लहान-मोठय़ा विक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. सीबीएस आणि मेहेर चौकातील कामामुळे वाहतुकीवर घालण्यात आलेल्या र्निबधाने महात्मा गांधी रोड, शिवाजी रस्ता, रविवार कारंजा परिसरातील व्यावसायिकांना, विक्रेत्यांना याचा फटका बसत आहे. महात्मा गांधी रस्ता, शालिमारकडून सीबीएसकडे जाणारा रस्ता वाहतुकीला बंद झाला आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने शक्यतो ते या परिसरातून ये-जा करणे टाळत आहेत. याचा परिणाम उपरोक्त मार्गासह रविवार कारंजा, सराफ बाजार, मेनरोड आदी भागातील बाजारपेठेवर होणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. कॉलेजरोड किंवा परिसरातील नागरिकांना सीबीएसकडून मध्यवर्ती बाजारपेठेत सरळ जाता येत नाही. वाहनधारकांना सांगली बँक, शालिमार, गंजमाळ सिग्नलमार्गे इतरत्र जावे लागते. उपरोक्त मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येऊन वाहतूक कोंडी होत आहे.

दिवाळीत खरेदीसाठी नागरिक मध्यवर्ती बाजारपेठेत येतात. या काळात शालिमार ते रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार, दहीपूल, कापड, भांडी बाजार, रविवार पेठ हे सर्व भाग ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातात. स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे या परिसरातील व्यवसायावर परिणाम होत आहे. या पाश्र्वभूमीवर मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यावसायिकांनी महापालिकेच्या तसेच स्मार्ट कंपनीच्या संथ कारभाराविरोधात सोमवारी दोन तास दुकाने बंद ठेवली. व्यावसायिकांनी एकत्र येत स्मार्ट रस्ता वाहतुकीसाठी खुला करा, अशा घोषणा दिल्या. यावेळी महापालिका कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला.

या बंदची ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने खरेदीसाठी संबंधित रस्त्यावर आलेल्या ग्राहकांना मात्र बंद दुकाने पाहून नेमका काय प्रकार झाला, हे कळेना. बंदचे कारण कळल्यावर काहींनी अन्य बाजारपेठांकडे मोर्चा वळविला. दुसरीकडे, मोर्चेकऱ्यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले. सध्या मंदीमुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यात स्मार्ट रस्त्याच्या संथ कामामुळे वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लवकरच दिवाळी सुरू होणार असल्याने या काळात व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर होतो. याचा विचार करत लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी व्यापारी आणि व्यावसायिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.

वाहतूक कोंडीत भर

स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे शिवाजी रोड आणि महात्मा गांधी रस्ता बंद केला आहे. सणावर रस्ताबंदीचे सावट असल्याने दसऱ्याला फारसा धंदा झाला नाही. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असतांना ग्राहकांकडून अडचणींचा पाढा वाचला जातो. वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागतेच, शिवाय वाहन उभे कुठे करावे, हा प्रश्न आहे. यामुळे रस्ता लवकर खुला करा. – संजय चौधरी(विक्रेता, महात्मा गांधी रस्ता)

..अन्यथा नाशिककरांचा उद्रेक

स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रत्यक्षात स्मार्ट रोडचे काम करणारे ठेकेदार, कामगार यांना या शहराशी काही देणे घेणेच नाहीे. सत्ताधाऱ्यांचाही यावर अंकुश नसल्याने त्यांचे फावत चालले आहे. आज संपूर्ण  शहर या स्मार्ट रोडने वेठीस धरले आहे. महासभेत वारंवार याबाबत प्रश्न उपस्थित केला. परंतु याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. आज फक्त दुकाने बंद ठेवली. परंतु हे असेच सुरू राहिल्यास मोठा उद्रेक होईल हे निश्चित – शाहु खैरे (महापालिका गटनेता, कॉंग्रेस)

आधीच मंदी, त्यात स्मार्ट रस्त्याची अनागोंदी

सध्या बाजारपेठेवर मंदीचे सावट आहे. त्यातही दसरा किंवा दिवाळीत वर्षांतील २० टक्यांहून अधिक खरेदी होते. दीड वर्षांपासून स्मार्ट रस्त्याचे काम रखडले आहे. या कामामुळे रस्ते बंद असल्याने ग्राहकांना आणि व्यावसायिकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहने कुठे लावायची, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करत अन्य ठिकाणी निघून जातात. दुसरीकडे, दर दोन-तीन महिन्यांनी रस्त्याचे काही तरी नवीन काम काढले जाते. या कामामुळे वैताग वाढला असून मनस्तापात भर पडत आहे. – अमित पवार(व्यावसायिक, अशोक स्तंभ)