जिल्ह्य़ात ३६ हजार रुग्णसंख्या
नाशिक : जिल्ह्य़ात करोनाचा संसर्ग फैलावतच असून शहर पोलीस दलात करोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या १४१ झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत अंबड तसेच इंदिरा नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अंबड पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेतील ५१ वर्षांच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे, जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ३६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
जिल्ह्य़ात एकीकडे रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. २८ हजार ५१२ करोनाबाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत नाशिक ग्रामीण ७१.८४, नाशिक शहर ८१.१७, मालेगाव ६९.९५ तर जिल्हा बाह्य़ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.८५ टक्के आहे. तसेच जिल्ह्य़ात बरे होण्याचे प्रमाण ७८.१४ इतके आहे. सद्य:स्थितीत सात हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ३९१, चांदवड ६०, सिन्नर ३३५, दिंडोरी ५८, निफाड ३७४, देवळा ६८, नांदगांव २४८, येवला ७७, त्र्यंबकेश्वर १८, सुरगाणा सहा, पेठ पाच, कळवण ११, बागलाण २३१, इगतपुरी ७७, मालेगांव ग्रामीण ३२३ याप्रमाणे एकूण दोन हजार २८२ करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार हजार १८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४३ तर जिल्ह्य़ाबाहेरील सात असे एकूण सात हजार ११६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिक ग्रामीण २४२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४८६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १११ आणि जिल्हाबाहेरील २३ अशा एकूण ८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 3:33 am