23 February 2019

News Flash

मंगळागौरीच्या खेळांना आता अर्थार्जनाची किनार

आदिशक्ती मंडळाच्या प्रतीक्षा नातू यांनी १० वर्षांपासून मंगळागौरीचे खेळ खेळत असल्याचे सांगितले

मंगळागौरीचे खेळ

बदलत्या काळानुसार चालीरीतींना आधुनिक स्वरुप

नाशिक : बदलत्या काळानुसार चालीरीतींना आधुनिक कल देत त्यात नावीन्य आणण्यासह त्याचा शरीरस्वास्थ्य राखण्यासह प्रबोधन, अर्थार्जनासाठी काही उपयोग होऊ शकतो, हे आता पाहिले जात असून श्रावणातील नवविवाहितेकडून मंगळागौरीची होणारी पूजा त्यातील एक होय. मंगळागौरीच्या खेळांना त्यादृष्टीने महत्त्व आले असून येणाऱ्या श्रावणात असे खेळ करण्यासाठी अनेक महिला मंडळांनी तयारीला सुरुवात केली आहे.

श्रावण म्हणजे सणांची रेलचेल. या सणांच्या मांदियाळीत पूर्वी सासूरवाशीण असलेल्या लेकीला जरा उसंत मिळावी यासाठी मंगळागौरीचे आमंत्रण पाठविले जायचे. तिची करमणूक व्हावी, तिने आपल्या सख्यासोबत गप्पांची मैफल रंगवावी, यासाठी मंगळागौरीचे खेळ व्हायचे. पूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीत खूप फरक पडला आहे.  बदलत्या काळानुसार निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

याविषयी नाशिक येथील हिरकरणी ग्रुपच्या मृणाल कुलकर्णी यांनी माहिती दिली. आम्ही साधारणत दीड ते दोन तासात १५ हून अधिक वेगवेगळे खेळ सादर करतो. अटूश पान, कोंबडा, किस बाई किस, गोफ, पाणी लाटा असे विविध प्रकार सादर करतांना प्रत्येक खेळाशी निगडीत योगासने आणि त्याचा शरिराला होणारा फायदा याकडे लक्ष वेधतो. तसेच त्यातून सामाजिक संदेश देण्याकडे आमचा कल आहे. समुहात साधारणत २० हून अधिक महिला आहेत. आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून दिवसाला तीन तास आमचा सराव सुरू आहे. साधारणत महिनाभर आधी ही तयारी सुरू होते. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धाश्रम, अनाथाश्रमात आम्ही खेळ सादर करत असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

आदिशक्ती मंडळाच्या प्रतीक्षा नातू यांनी १० वर्षांपासून मंगळागौरीचे खेळ खेळत असल्याचे सांगितले. पहिल्यांदाच आता व्यावसायिक स्तरावर काम करण्यास सुरू केले आहे. पारंपरिक गीतांसोबत ओव्यांचा आधार घेत आम्ही खेळाची मांडणी केल्याचे नातू यांनी सांगितले.

सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

तरुणींमधील मंगळागौरीच्या खेळाची आवड लक्षात घेत मंगळागौरीचे खेळ खेळणारे विविध चमू त्या दृष्टीने मंगळागौरीच्या गीतात काही बदल करत मुलीच्या जन्माचे स्वागत, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, सभोवताली वाढणारे प्रदूषण, वाहतूक नियमांचे प्रबोधन असे विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मंडळे आपल्या पारंपरिक गीतांसोबत संतांनी रचलेल्या ओव्यांचा आधार घेत खेळाची नव्याने मांडणी करत आहेत. मंगळागौरीच्या खेळासाठी आवड तसेच अर्थार्जनाचे माध्यम म्हणून पाहत अनेक महिला मंडळ यामध्ये सक्रिय झाले आहेत. काही मंडळे केवळ मंगळागौरपुरता, तर काही डोहाळ जेवण तसेच अन्य काही कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

First Published on July 12, 2018 2:27 am

Web Title: social messages delivered from mangala gauri games