News Flash

‘सोशल नेटवर्कीग’चा ५२ आदिवासी गावांची तहान भागविण्याचा संकल्प

२०१० मध्ये स्थापन झालेल्या फोरमतर्फे सामाजिक उत्तर दायित्वातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

रविवारी तोरंगण जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
तब्बल ७० लाखाचा सरकारी निधी खर्च होऊनही टंचाईग्रस्त गावाचा शिक्का पुसू न शकलेले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण हे गाव. याच ठिकाणी सोशल नेटवर्कीग फोरमने अवघ्या सहा लाखात निर्मिलेल्या शुध्दीकरण प्रकल्पाद्वारे बारमाही पिण्यासाठी तसेच वापरासाठीचे पाणी उपलब्ध करण्याची किमया प्रत्यक्षात आणली आहे. या माध्यमातून प्रदीर्घ काळापासून पाण्यासाठी भटकणाऱ्या तोरंगणच्या ग्रामस्थांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. महत्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पासाठी फेसबुकवरील तरूण नेटीझन्स, अनिवासी भारतीय आणि शहरातील डॉक्टर्स यांच्या दातृत्वातून निधी संकलित झाला. फोरमने आता तोरंगणच्या सभोवतालच्या ५२ गावे-पाडय़ांचा पाणी प्रश्न सोडविण्याचा संकल्प केला आहे. दुष्काळामुळे संपूर्ण जिल्हा संकटात असताना सोशल नेटवर्कीग फोरमचा उपक्रम टँकरने पाणी देण्यात मग्न असणाऱ्या तसेच पाणी पुरवठा योजना राबविणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे.
समाज माध्यमांतील तरुणाईच्या सहकार्यातून २०१० मध्ये स्थापन झालेल्या फोरमतर्फे सामाजिक उत्तर दायित्वातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून तोरंगणचा पाणी प्रश्न सोडविण्याची संकल्पना मांडण्यात आली. एखाद्या गावाचा टंचाईचा प्रश्न इच्छाशक्तीच्या बळावर महिनाभरात दूर होऊ शकतो ही बाब लालफितीच्या कारभाराला चमत्कारीक वाटू शकते. सोशल नेटवर्कीग फोरम सामाजिक संघटनेला सकारात्मक प्रतिसाद देणारे तोरंगणचे ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे. या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी सकाळी साडे नऊ वाजता ग्रामस्थ शांताबाई बोरसे, मालतीबाई बोरसे, नलिनीबाई चौधरी, सीताबाई बोरसे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनील लांडगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटीया यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तोरंगण हे गाव नाशिककरांना आणि साहित्यप्रेमींना अनेक वर्षांपासून परिचयाचे. त्याचे कारण म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना या गावाविषयी वाटणारी तळमळ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने या गावी काही कार्यक्रमही झाले होते. तात्यानंतर पुढे हळूहळू हे गाव पुन्हा पोरके झाले. दरवर्षी फेब्रुवारी ते जून हे पाच महिने तर पिण्यासाठी पाणी मिळविणे एवढेच काम दिवसभरात असायचे. शासन दरबारी प्रयत्न करूनही फार काही झाले नाही. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या गावावर ७० लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जाते. हा खर्च नेमका कुठे झाला हे गावातील टंचाईची गंभीर स्थिती पाहिल्यास लक्षात येत नाही. फोरमचा प्रथम वर्धापन दिन तोरंगणला साजरा झाला. त्याआधी तेथील पाणी टंचाईचा अभ्यास करून उपाययोजना फोरमने आखल्या होत्या. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रास नावाची नदी आहे. या नदीला बारमाही पाणी असते. परंतु, हरसूल गावातील सांडपाणी नदीत मिसळत असल्याने ते पिण्यालायक नव्हते. मग, वर्षांतील पाच महिने ग्रामस्थ दिवसभर बादल्या घेऊन दुरदूपर्यंत पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडत असे.
फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्यातून हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्याचा निर्णय घेतला. भूगर्भतज्ज्ञ डॉ. जयदीप निकम यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. गाव खडकावर असल्याने विहीर अथवा कुपनलिका खोदणे अशक्य असल्याचा अहवाल त्यांनी दिला. मग, नदीतून जलवाहिनीने पाणी आणायचे तर जलशुध्दीकरण केंद्र उभारणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. नदीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून ते पिण्यालायक शुध्द, र्निजतुक होऊ शकते याची शाश्वती मिळाली. ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन विचार विनिमय झाला. ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादातून जलशुध्दीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय झाला आणि प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, मितेश मुथा, डॉ. प्रशांत देवरे, राहुल बोरसे यांनी काम पूर्ण केले. पूर्ण शुध्द केलेले अतिशुध्द पाणी एटीएमसारख्या यंत्रणेतून एक रुपयाचे नाणे टाकून प्रत्येकी २० लिटर केवळ पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. हे पैसे ग्रामपंचायतीकडे जमा होऊन प्रकल्पाच्या भविष्यातील देखभालीचा विनियोग व्हावा हा उद्देश आहे. उर्वरित कमी शुध्द पाणी विहिरीत टाकून ते अन्य वापरासाठी बाराही महिने विनामूल्य उपलब्ध होईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. अवघ्या सहा लाखात साकारलेला तोरंगण जलशुध्दीकरण प्रकल्प सर्वासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पुढील काळात आसपासच्या ५२ गावे-पाडय़ांचा पाणी प्रश्न सोडविण्यावर फोरम लक्ष केंद्रीत करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:51 am

Web Title: social networking forum pledge to resolve water problem of 52 tribal villages
Next Stories
1 मराठी भाषादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
2 दुचाकी वाहन, सिलिंडर चोरटे जेरबंद
3 ‘आदर्श नाशिक – एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ ४० प्रकल्पांचे विज्ञान प्रदर्शन
Just Now!
X