शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अमृतधाम परिसर अपघातप्रवण क्षेत्र ठरल्याचे अधोरेखीत होत असूनही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी जननायक वैचारिक मंच व संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अलीकडेच अपघातात रस्त्यालगत उभी असणारी नऊ वर्षीय मुलगी व तिची आई गंभीर जखमी झाली. या जखमींकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला.
राष्ट्रीय महामार्गावरील के. के. वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल या दरम्यानच्या चौफुली राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या सदोष नियोजनामुळे अपघात क्षेत्र बनले आहे. रासबिहारी चौकात सातत्याने अपघात घडत आहेत. अपघातांच्या मालिकेने अनेकांना प्राण गमवावे लागले. काही दिवसांपूर्वी अमृतधाम चौफुलीवर तिहेरी अपघातात पाच ते सहा जण जखमी झाले. निकीता खंदारे (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिचे पाय निकामी होण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. निकीताच्या आईला गंभीर दुखापत झाली. अपघाताची भीषणता लक्षात घेऊन स्थानिकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांवर अमानुष लाठीमार केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संघर्ष समितीने केली. वारंवार अपघात घडूनही राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाने उपाय करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्राधिकरणाच्या कार्यशैलीचा निषेध करण्यात आला.