अंध शाळा आणि नॅबच्या वसतिगृहातील प्रकार; कारवाईचे आदेश

नाशिक : नाशिक रोड येथील अंध शाळेत कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्यांना जबर मारहाण, सातपूर येथे नॅबच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार असे समाजविघातक प्रकार माध्यमांनी उजेडात आणल्यावर समाज कल्याण विभागाने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी  संशयित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करणे, कर्मचाऱ्याचे निलंबन करण्याच्या कारवाईचा आदेश समाज कल्याणकडून देण्यात आला.

अंध मुलांच्या वसतिगृहात तेथील कर्मचाऱ्याने मद्याच्या नशेत अधीक्षकांच्या अनुपस्थितीत तेथे राहणाऱ्या चार विद्यार्थ्यांना बॅटीने मारहाण केली. राजकीय पक्षाच्या वतीने या गंभीर प्रकाराला वाचा फोडल्यानंतर समाज कल्याणच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देत आवश्यक कारवाई केली. तर सातपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड (नॅब) संस्थेच्या सातपूर येथील निवासी शाळेतही एका अल्पवयीन मुलीवर तेथे काम करणाऱ्या संशयित बाळू धनवटे याने अत्याचार केला.

पीडित मुलीने हा प्रकार आपल्या काही मैत्रिणी तसेच काळजीवाहक अलका पवार यांना सांगितला.

मात्र या प्रकाराची गंभीर दखल न घेता संबंधिताकडून केवळ चौकशीचे सोपस्कार पार पाडण्यात आले.

माध्यमांद्वारे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाज कल्याण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. नॅब प्रकरणातही समाज कल्याण विभागाच्या वतीने संस्थेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. तसेच संशयित धनवटेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे तसेच त्यास निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मंगळवारी समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्य़ातील विशेष बालकांसाठी असणाऱ्या शाळा-निवासी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, वसतिगृह चालविणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.

बैठकीत शाळा किंवा संस्था पातळीवर नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सखोल माहिती घेत त्याची चारित्र्य पडताळणी, शाळा-वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, विद्यार्थिनींच्या वसतिगृहात किंवा शाळेत महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्या त्या वेळी विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेणे, तसा अहवाल समाजकल्याण विभागाकडे सादर करणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

..मग दाद कोणाकडे मागायची

वेगवेगळ्या घटनांमध्ये बालकांचे होणारे शारीरिक, मानसिक, लैंगिक शोषण पाहता त्यांना तक्रार करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाच्या बाल कल्याण समितीकडे दाद मागता यायला हवी. या ठिकाणी स्वतंत्र समिती असून ती प्रत्यक्ष पीडितांशी संपर्क साधत तो प्रश्न सुटावा यासाठी पाठपुरावा करत आहे. सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्य़ातील २७ बालगृह तसेच विशेष बालकांसाठी असणाऱ्या शाळा, वसतिगृह हे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येत असल्याने शोषण विषयक तक्रारीत दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.