स्वच्छता, आरक्षण, पर्यावरण, वाचन संस्कृती, राष्ट्रप्रेमचा संदेश

लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न आजकाल अतिशय तुरळक मंडळांकडूनच होताना दिसत आहे. भव्य मूर्ती, आकर्षक सजावट, मनोरंजनात्मक कार्यक्रम, विद्युत रोषणाई यावर अलीकडे भर देण्यात येत आहे. या कोलाहलातही शहरातील काही मंडळांनी देखाव्यांमधून समाज प्रबोधनाचा वसा कायम ठेवला असून त्यांच्या पयत्नांना नागरिकांकडूनही चांगली दाद मिळत आहे.

यंदा थर्माकोल तसेच प्लास्टिकबंदीमुळे सजावटीला काही अंशी र्निबध आल्याने बाप्पाप्रेमींचा हिरमोड झाला. मंडळांनी यावर पर्याय म्हणून आकर्षक मूर्ती तसेच चलत देखाव्यांना प्राधान्य दिले. काहींनी जिवंत देखाव्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनावर भर दिला. सोमवार पेठेतील वेलकम सहकार्य मित्र मंडळाच्या वतीने यंदा ‘भांडण जातीचे, नुकसान मातीचे’ हा जातिभेद विरोधातील जिवंत देखावा तयार करण्यात आला आहे. आरक्षण फक्त गरजवंतांसाठी असावे, त्यात कुठलाही जातिभेद नसावा. जातीयवादी पुढाऱ्यांच्या आहारी न जाता तरुणांनी आपले भविष्य अंधारमय न करता भारतीय हीच आपली जात मानावी, असा संदेश या देखाव्यातून देण्यात येत आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी दुनियादारी चित्रपटातील पात्रांची पाश्र्वभूमी घेण्यात आली आहे. संवाद लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनय ही सर्व सूत्रे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळली आहेत. गणपती बाप्पासोबत जातींचेही विसर्जन होऊन राष्ट्रप्रेमाची स्थापना प्रत्येक घरात व्हावी, नव्या पिढीपर्यंत जातीचा नव्हे, तर देशप्रेमाचा वारसा पोहचावा यासाठी मंडळ आग्रही आहे.

इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. शाळेच्या आवारातच असलेल्या नारळाच्या झाडाचा कल्पकतेने वापर करत विद्यार्थ्यांनी झाडालाच पर्यावरणपूरक गणेश रूप दिले.. मुलांची ही कल्पकता सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. दिवसेंदिवस वाढत असणारे प्रदूषण आणि त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी निसर्गातीलच देवाची पूजा व्हावी यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात यावी, हा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. झाडे लावा आणि त्यांचे संगोपन करा असे आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. शालिमार परिसरातील जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने खराटय़ांचा वापर करत गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ‘स्वच्छता’ तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या या धामधुमीत घरगुती गणेशोत्सवही यात तसूभर मागे नाही.

‘भिलार’ची प्रतिकृती

इंदिरानगर येथील डॉ. सायली आणि योगेश आचार्य यांनी पर्यावरणपूरक आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत ‘भिलार’ या पुस्तकांच्या गावाची प्रतिकृती तयार केली आहे. महाबळेश्वरजवळील पुस्तकांचे गाव असलेल्या भिलार गावातील घरे आणि अन्य परिसर हा रद्दी म्हणून फेकून देण्यात येत असलेले कागद, खोके याचा वापर करून तयार केला आहे. सर्व घरे दाखविता आली नसली तरी प्रातिनिधिक स्वरूपात भाऊ व्हिला, स्त्री साहित्य, लोकसाहित्य, मंगलतारा, तेथील शाळा यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.