वीज बचतीसाठी महापालिकेच्या इमारतींवर प्रकल्पाची उभारणी

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत वीज बचत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे एकूण एक मेगावॉट विजेची निर्मिती होणार असून महापालिकेच्या मालकीच्या १५ इमारतींच्या गच्चीवर हे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहे. त्यापैकी १२ इमारतींवर ‘सोलर रुफ टॉप’ बसविण्यात आले असून, नवीन वर्षांत येथील कार्यालये सौर ऊर्जेने उजळून निघणार आहेत. सौर ऊर्जेच्या वापरातून महापालिकेची वर्षांकाठी एक कोटींची बचत होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.

नागरिकांनीही सौर ऊर्जेकडे वळावे, जेणेकरून पारंपरिक स्रोतांवरील भार कमी होईल. तसेच शासनाची बचत होईल हा यामागील उद्देश आहे. वासंग सोलर कंपनीच्या सहकार्याने २५ वर्षे कालावधीसाठी पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जात आहे. या कालावधीत देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी निधीमधून या प्रकल्पासाठी एकही रुपयाही खर्च होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. महानगरपालिकेच्या १२ इमारतींच्या गच्चीवर सौर ऊर्जेसाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नवीन वर्षांत या १२ इमारती सौर प्रकाशात उजळतील. महापालिकेच्या मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवन येथे २०७.२ किलोवॉट वीजनिर्मिती होईल. जिजामाता रुग्णालयात १३.२ किलोवॉट, सिडको विभागीय कार्यालय १५.५४, मायको रुग्णालय १०.५६, नाशिक रोड विभागीय कार्यालयात ५२.८, लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय येथे २५.१६, पंचवटी विभागातील अग्निशमन केंद्र २६.४, शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्र १३.२, महात्मा फुले कलादालन ५९.२, फाळके स्मारक येथे ६६.३३ झाकीर हुसैन रुग्णालय १००.६४ किलोवॉट अशी वीजनिर्मिती होईल. या इमारतींवर ‘सोलर रुफ टॉप’ बसविण्यात आले आहेत. नवीन वर्षांत या सर्व ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर सुरू होणार आहे.

एकूण एक मेगावॉट विजेची निर्मिती

पुढील काळात महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात १०० किलोवॉट, मुकणे जलशुध्दीकरण प्रकल्प १३८ किलोवॅट, आणि शिवाजी नगर जलशुध्दीकरण प्रक्रिया केंद्रात ११८ किलोवॉट वीज निर्मिती होणार आहे. या तिन्ही ठिकाणी लवकरच सोलर रुफ टॉप बसवून सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येईल. याद्वारे एकूण एक मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येणार असून नाशिक महानगरपालिकेचा विजेवर होणाऱ्या खर्चात दरवर्षी एक कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे.