शरद पवार यांचे आश्वासन

नाशिक : राज्यातील कामगारांशी संबंधित विविध प्रश्नांबाबत शरद पवार यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने पवार यांनी नंतर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्याशी चर्चा केली. कामगार मंत्र्यांसोबत कृती समितीची संयुक्त बैठक आयोजित करून हे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

गेल्या आठवडय़ात पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी सिटूतर्फे कामगारांच्या प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन पवार यांनी दौरा झाल्यानंतर कामगारांचे प्रश्न, समस्या जाणून घेतले. आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या गठित केलेल्या नाहीत. अनेक मंडळे (सुरक्षा रक्षक मंडळ माथाडी मंडळ) फक्त अधिकाऱ्यांमार्फत चालविली जात आहेत. सर्व कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या आणि मंडळावर राष्ट्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेण्यात यावेत अशी मागणी डॉ. कराड यांनी केली.

असंघटित कामगार कल्याण कायदा मंजूर होऊनही त्याची अमलबजावणी होत नाही. असंघटित क्षेत्रातील १२२ प्रकारची कामे करणाऱ्या आणि सुरक्षित असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ गठीत करावीत, त्यांची नोंदणी करावी. त्यांना सामाजिक सुरक्षा आरोग्य, विमा, निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली. निधी जमा करण्यासाठी स्वतंत्र सेस लागू करावा. उस तोडणी कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे आणि साखरेवर सेस लावून त्यांच्यासाठी निधी उभारावा, हा मुद्दा चर्चेत मांडण्यात आला. बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे आठ हजार कोटी रुपये निधी पडून आहे. टाळेबंदीत काम नसल्याने या मजुरांची उपासमार होत आहे. या सर्व मजूरांना १० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील ३५० कामगारांना माजी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी कामावरून कमी करून त्यांच्यावर अन्याय केला. त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत हस्तक्षेप करावा अशी विनंती करण्यात आली. आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची अमलबजावणी करावी तसेच केंद्र सरकार कामगार कायद्यांमध्ये कामगार विरोधी बदल करत आहे. त्याला राज्य सरकार म्हणून महा विकास आघाडी सरकारने विरोध करावा, अशी विनंती करण्यात आली.

कामगारांचे प्रश्न जाणून घेत पवार यांनी कामगारमंत्री, कृती समितीचे नेते यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले.