शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांविषयी प्रबोधन केले जात असले तरी वाहनचालकांचा मनमानी कारभार सर्वश्रुत आहे. या बेशिस्तपणाला चाप बसावा यासाठी शहर पोलिसांनी अत्याधुनिक अशी वाहने शहरात आणली असून गस्तीच्या माध्यमातून वाहतुकीवर देखरेख करण्यात येणार आहे. बेशिस्त वाहनचालकांना जागेवरच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

शहर विकासाच्या वाटेवर असतांना शहरातील वाहन संख्याही दिवसागणिक वाढत असून वाहनांच्या वेगामुळे अपघाताच्या संख्येतही वाढ होत आहे. याबाबत कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करून तसेच जनजागृतीच्या माध्यमातून लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली जात आहे. परंतु, पोलिसांच्या नरमाईला न जुमानता वाहनधारकांची बेपर्वाई सुरूच आहे.  या पाश्र्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत एक पाऊल पुढे टाकले आहे. पोलिसांच्या वाहन ताफ्यात बुधवारी आधुनिक सोयींनी युक्त अशी वाहन वाहतूक नियमन व्यवस्था आणण्यात आली आहे. या अंतर्गत व्हिडिओ बेस्ड लेजर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम (लेजर स्पीडगन), ब्रेथ अनालायझर आणि टिन्ट मीटर निरीक्षक काम करणार आहे.

या अत्याधुनिक साधनांनी सज्ज अशी दोन वाहने नाशिक पोलीस वाहन ताफ्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-शिंगे यांनी दिली.  लेझर स्पीडगनमध्ये मेगा पिक्सल कॅमेरा असून महामार्गासह वर्दळीच्या ठिकाणी ही गन काम करेल. या माध्यमातून वाहनांचा वेग आणि अंतर मोजले जाईल. वाहन आवाजाच्या क्षमतेपेक्षा जोरात भोंगा वाजवतो की काय, याची पाहणी होईल. याचे चित्रीकरण होत असल्याने कायदा मोडला हे सिद्ध करून वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करणे सोपे होणार आहे. मद्याचे सेवन करत वाहन चालविणाऱ्यांची तपासणी ब्रेथ अनालायझरने होणार आहे. तसेच, टिन्ट मीटरच्या माध्यमातून वाहनांच्या काचांची दृश्यता तपासली जाणार आहे.

वाहनामध्ये दोन स्वतंत्र पेटय़ा आहेत. एकामध्ये लाइट स्क्रीन आणि दुसरीत सेन्सर आहे. काचेच्या दोन्ही बाजूस या पेटय़ा जोडल्यानंतर त्याच्या पडद्यावर गाडीच्या काचेची दृश्यमानता तपासली जाईल. जेणेकरून वाहनातील गैरप्रकारांना र्निबध घालता येईल. ही वाहने महामार्ग, उड्डाणपुलासह वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालणार आहे.