25 February 2021

News Flash

मुलांसाठी विशेष आरोग्य तपासणी अभियान

तपासणीतील निष्कर्षांसाठी खास ‘आरोग्य पत्रिका’ तयार करण्यात आली असून त्यावर आवश्यक नोंदी करण्यात येतील.

 

महापालिकेच्या वतीने ‘स्वस्थ मुलं..स्वस्थ नाशिक’ उपक्रमाअंतर्गत शाळा व अंगणवाडीतील मुलांसाठी विशेष आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत उपचार आवश्यक असणाऱ्या विशेष बालकांवर राजीव गांधी योजनेतंर्गत तसेच सरकारी दवाखान्यात मोफत उपचार होणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात एक ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सातपूरच्या महापालिका विद्यानिकेतन शाळा क्रमांक आठ येथे होणार आहे. या बाबतची माहिती पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहा स्वतंत्र आरोग्य तपासणी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांमार्फत पालिका शाळांमधील तसेच अंगणवाडीमधील बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. यात बालकांचे वजन, उंची, हृदय, पोट व नेत्रविकार, कान, नाक, घसा यांचे आजार, दंत आजार, त्वचा रोग, सांधेदुखी, जीवनसत्त्वाची कमतरता, रक्ताक्षय, झटके येणे, मनोविकार यासह अध्ययन अक्षम, बहुविकलांग, स्वमग्न, सेलेब्रल पाल्सी आदी व्याधीग्रस्त बालकांवर उपचार करण्यात येणार आहेत. तपासणीतील निष्कर्षांसाठी खास ‘आरोग्य पत्रिका’ तयार करण्यात आली असून त्यावर आवश्यक नोंदी करण्यात येतील.

दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या किरकोळ आजारांवर तत्काळ उपचार करण्यात येणार असून गंभीर आजारांवर विद्यार्थी पूर्णपणे बरा होईपर्यंत उपचार करण्यात येतील. ही सर्व आरोग्य सेवा मनपाच्या वतीने मोफत देण्यात येणार असून गंभीर स्वरूपाच्या आजार व शारीरिक व्यंगावर ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ अंतर्गत मान्यता प्राप्त रूग्णालयात मोफत उपचार होतील. याशिवाय महापालिकेने ५० लाख रुपयांची विशेष तरतूद अशा बालकांसाठी केली आहे. जेणेकरून बालकांवर अत्याधुनिक उपचार करणे सुलभ होईल. तसेच, संदर्भित रुग्णालयात उपचाराची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय देवकर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण भोये यांचे संनियत्रण पथक तयार करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात शालेय विद्यार्थी व नोव्हेंबरमध्ये अंगणवाडीतील बालकांची तपासणी होणार आहे. ही मोहीम प्रत्येक वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे कृष्णा यांनी सांगितले.

‘स्वस्थ मुलं..स्वस्थ नाशिक’

महानगरपालिकेच्या १२८ प्राथमिक शाळेतील ३१ हजार ६०० विद्यार्थी, १३ माध्यमिक शाळेतील ३,३८३ विद्यार्थी तसेच ४१८ अंगणवाडीतील १३ हजार ५०० बालकांवर अभियानाच्या माध्यमातून उपचार. यासाठी सहा वैद्यकीय पथकांतून २४ वैद्यकीय अधिकारी, सहा औषधनिर्माणशास्त्र तज्ज्ञ, ६ परिचारिका यांची नियुक्ती. बालकांच्या आरोग्यविषयक निष्कर्षांची ‘आरोग्य पत्रिकेत नोंद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 12:49 am

Web Title: special health check up campaign for student in nashik
Next Stories
1 सप्तशृंगी गडावर शारदीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
2 वाहतूक कोंडीत ‘गोळे’ कॉलनी
3 गुन्हे वृत्त : २८ लाखांच्या भंगार मालाचा चालकाकडून अपहार
Just Now!
X