केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

देशात वनौषधींचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यासाठी खास योजना आखण्यात आल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे निराश झालेल्या शेतकऱ्याला कृषी महोत्सवातून ऊर्जा मिळेल, असेही त्यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आणि कृषी विभाग यांच्यातर्फे आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी नाईक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर झालेल्या या सोहळ्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, खा. राजू शेट्टी, महापौर अशोक मुर्तडक, स्वामी समर्थ गुरुपीठाचे अण्णासाहेब मोरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भारत हा कृषिप्रधान देश असून सर्व समाजाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

समर्थ शेतकरी घडविण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम महोत्सवातून होईल. शेतकऱ्यांनी शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी, जेणेकरून त्यांना आर्थिक लाभ होईल आणि देशाच्या कृषी विकासाला गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

सावरा यांनी जिल्ह्यात आदिवासी समाज मोठय़ा प्रमाणात असून त्यांना या महोत्सवाचा लाभ होणार असल्याचे सांगितले. या भागातील पारंपरिक शेती व्यवसायाला नवीन दिशा मिळणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

अध्यात्माचा वापर सर्वसामान्यांच्या विकासासाठी करण्याचे हा महोत्सव उत्तम उदाहरण आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची मानसिक क्षमता सक्षम करण्याचा प्रयत्न झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. प्रदर्शनातील समर्थ अ‍ॅग्रो विभाग, पशुधन, बारा बलुतेदार विभागाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, दुष्काळग्रस्त व गरजू शेतकऱ्यांना शेतीउपयोगी, शैक्षणिक व जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आल्याचे आयोजकांनी या वेळी सांगितले.ह्ण

‘नारायण राणे सभ्यता शिकतील’

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची कोकणात आजही दादागिरी आहे काय, या प्रश्नावर ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे नाव न घेता टोलेबाजी केली. आमच्या गावात आल्यामुळे तेदेखील सभ्यता व शालीनता शिकतील. पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून कोकणात आपण अनेक कामे केली. त्यामुळे विकासाचा लाभ कोकणवासीयांच्या दारापर्यंत पोहोचला असल्याचे केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी केसरकर, महापौर यांनी प्रदर्शनास आलेले शेतकरी यांच्यासोबत रामकुंड येथे गंगापूजन केले. प्रदर्शनानिमित्त शेतकऱ्यांच्या कुंभस्नानाचे आयोजन करण्यात आले होते.