बालकल्याण विभागासह अन्य संस्थांचा सहभाग, जिल्ह्य़ात १२ बालगृहे

नाशिक : आरोग्य विभागासह प्रशासनाला आव्हान ठरू पाहणाऱ्या ‘करोना’शी दोन हात करण्यासाठी प्रत्येक विभाग सक्रिय झाला आहे. अनाथ बालकांची या परिस्थितीत काळजी घेतली जावी म्हणून महिला बालकल्याण विभागासह त्यांचे संगोपन करणाऱ्या संस्था पुढे सरसावल्या आहेत. बालकांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

जिल्ह्य़ात अनाथ बालकांच्या संगोपनासाठी नाशिक, मालेगाव, मनमाड, दिंडोरी, वणी, बोरगाव आदी ठिकाणी १२ बालगृह आहेत. या बालगृहांमध्ये शून्य ते १८ वयोगटातील  ७०० ते ८०० बालके दाखल आहेत. काही दिवसांपासून करोनाचा वाढता फैलाव पाहता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुटी जाहीर केली. परीक्षा पुढे ढकलल्या. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावी पाठवून देण्यात आले. परंतु, या सर्वापेक्षा अनाथ बालकांची स्थिती वेगळी आहे. शाळा बंद असल्या तरी त्यांना बालगृहात राहणे गरजेचे आहे. बदलते वातावरण पाहता बालकांच्या आरोग्याला बाधा पोहचु नये यासाठी शासन सक्रिय आहे. याविषयी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शुभांगी बेलगांवकर यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बालगृहातील बालकांच्या सुरक्षेसाठी तेथील कर्मचाऱ्यांचे महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेण्यात आले असल्याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांना स्वच्छता कशी ठेवावी, हात कसे धुवावे याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हात धुण्यासाठी सॅनिटायझर तसेच मास्कचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. बाहेरील लोकांचा बालकांशी थेट संपर्क येणार नाही, यादृष्टीने काळजी घेण्यात येत असल्याचे बेलगांवकर यांनी सांगितले.

अशोकस्तंभ येथील आधाराश्रमात सध्या शून्य ते १२ वयोगटातील १४० पेक्षा अधिक बालके आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. मुलांना एकत्र बसवून करोना आजाराविषयी माहिती देण्यात येत आहे. जेवणाआधी मुले हात धुतात की नाही याची पाहणी होत आहे, बाहेरील देणगीदारांकडून तेलकट तसेच मसालेदार पदार्थ घेणे बंद करण्यात आले असून देणगीदारांचा बालकांशी थेट संपर्क होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. त्यांची दररोज आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

बालके आणि कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे आधाराश्रमाचे समन्वयक राहुल जाधव यांनी सांगितले. उंटवाडी येथील निरीक्षण आणि बालगृहात ही सध्य स्थितीत ७५ बालके आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले असून मुले निरीक्षण गृहाबाहेर जाणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे.