News Flash

जिल्हा रुग्णालयाच्या भिंतींना बोलके स्वरूप

जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत यासंदर्भात ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा रूग्णालयाच्या भिंतींवर व्यसनांचे दुष्परिणाम दाखविणारी चित्रे काढण्यात आली आहेत.

प्रबोधनात्मक चित्रांच्या माध्यमातून तंबाखूमुक्त मोहीम

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय तंबाखूमुक्त संस्था व्हावी यासाठी दंडात्मक कारवाई, समुपदेशनासह, मदतवाहिनी असे विविध उपाय सुरू आहेत. याअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात तंबाखूमुक्त रुग्णालयाचा जागर होण्यासाठी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ललित कला महाविद्यालयाच्या मदतीने व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी प्रबोधन करण्यासाठी भिंती रंगविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत तंबाखू सेवन विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी यांची एकत्रित समिती गठीत करण्यात आली आहे. याअंतर्गत तंबाखू सेवन, धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत यासंदर्भात ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

दुसरीकडे प्रबोधनावर भर देण्यात येत आहे. रुग्णालयाच्या आवारात रुग्ण आणि नातेवाईकांचा वावर, त्यांची ग्रहण करण्याची क्षमता, मानसिक स्थितीचा विचार करता जिल्हा रुग्णालयाच्या भिंती या प्रबोधनासाठी वापरण्याचे ठरले.  रुग्णालयाकडून शहर परिसरातील कला महाविद्यालयांना भिंतीवर प्रबोधनात्मक संदेश देण्याविषयी सुचवीत भित्तिचित्र स्पर्धा घेण्यात आली. मविप्रच्या ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह अन्य महाविद्यालयांतील काही विद्यार्थ्यांनी या आवाहनास प्रतिसाद दिला.

विविध संकल्पना, कल्पनाशक्तीचा वापर  करत विद्यार्थ्यांनी व्यसनाचे वेगवेगळे प्रकार, त्याचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसनामुळे होणारे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण यावर भर देत विविध चित्रे भिंतीवर रेखाटली. काहींनी ऑक्टोपसरूपी तंबाखूच्या विळख्यात अडकलेली माणसे, आपण सिगारेट पीत नाही तर सिगारेट आपल्याला पिते, सिगारेट-तंबाखूमुळे झालेला कर्करोग आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी झालेला खर्च, झालेली हानी तराजूच्या प्रतिकात्मक रूपात रेखाटली.

या प्रबोधनात्मक रंगीत संदेशामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या िभती आता बोलू लागल्या आहेत.  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर-गाभणे यांनी माहिती दिली. तंबाखू सेवन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो, परंतु त्या वेळी असे काही फलक रुग्णालयाच्या आवारात लावलेले असल्याचे आम्ही वाचलेच नाही, असा बचावात्मक पवित्रा रुग्ण व नातेवाईकांकडून घेतला जाते.

या पाश्र्वभूमीवर याविषयी प्रबोधन होण्याकरिता भिंती रंगविण्याचे ठरविल्याचे त्यांनी नमूद केले. खाद्यगृह, बाह्य़ रुग्ण विभाग, रक्तपेढी, जिल्हा शासकीय रुग्णलयातील निवारा आदी ठिकाणी व्यसनांचे दुष्परिणाम दर्शविणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. यामुळे किमान ज्यांना वाचता येत नाही, त्यांना चित्रातून तरी त्याची दाहकता समजेल, अशी अपेक्षा बांगरे यांनी व्यक्त केली.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील भिंती रंगविण्यासाठी एंजल्स आर्टिस्ट ग्रुप, शंभुराजे ग्रुप, वुई आर आर्टिस्ट, डिझायनल ग्रुप, फाइव्ह स्टार ग्रुप, ए-झेड, शलाका ग्रुप आदींनी सहभाग घेतला. पुढील टप्प्यात यातील काही निवडक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्ह्य़ातील २८ रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्तीचे संदेश देणारी भित्तिचित्रे काढण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:32 am

Web Title: speech form for walls of district hospital
Next Stories
1 केरळ विकास समितीच्या ‘हेल्मेट सक्ती’ जनजागृतीचे शतक
2 सनातन संस्थेला कोणाचा राजाश्रय?-पृथ्वीराज चव्हाण
3 मुंढेंविरोधात सर्वपक्षीय युतीसाठी भाजपचाच पुढाकार
Just Now!
X