नाशिक : जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय कार्यक्रम होणार असून यानिमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळे उपक्रम होणार आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजवंदन सोहळा होईल. विभागीय आणि जिल्हा मुख्यालय या ठिकाणी गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेना, रेल्वे सुरक्षा दल यांचे संयुक्त संचलन होईल. शहराच्या अधिकाधिक भागात पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, रेल्वे सुरक्षा दल यांचे संयुक्त संचलन होणार आहे.

शिक्षण विभागाच्या कक्षेत येणाऱ्या संस्थांकडून या वेळी प्रजासत्ताक हा महोत्सव व्हावा या अनुषंगाने देशभक्तीपर आणि शहिदांच्या स्मृतीसाठी सामुदायिक कार्यक्रम घेण्यात येतील. गावांमध्ये साफ सफाई मोहीम राबविण्यात येणार असून त्यानंतर प्रभात फेरी निघेल. गावातील चावडय़ा, सार्वजनिक कार्यालये, दवाखाने, वाचनालय, शाळा, खाजगी इमारत या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्याची सूचना करण्यात आली आहे. देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात  येणार आहेत. त्याच वेळी सार्वजनिक विहिरी आणि गावांची तळी स्वच्छ करण्यासाठी गाव पातळीवर श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाकडून प्रभात फेरी, ध्वजवंदन यापलीकडे जात वेगवेगळ्या उपक्रमांची भर दैनंदिन कार्यक्रमात घालण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी प्रजासत्ताक दिनी सर्वाकडून ‘स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे, ध्येय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे’ ही शपथ घेण्यात येणार आहे.

या शिवाय विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी सातत्याने पिण्याची सवय लागावी यासाठी २६ जानेवारीपासून सर्वच शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ उपक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच, ‘सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वाचे’ अंतर्गत दररोज परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करण्यास प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात होणार आहे.

उपक्रमांची भर

शिक्षण क्षेत्रात सातत्याने प्रयोगशीलता जपली जात असली तरी दररोज नवनवीन प्रयोगांची, उपक्रमांची भर यामध्ये पडत आहे. वॉटर बेल, पर्यावरण शपथ यासह अन्य उपक्रमांची गरज काय, त्याने काय साध्य होणार, उपक्रमांची आखणी करताना त्याचा पाठपुरावा, नियमितता याविषयी कोठेही विचार होत नाही. केवळ कागदोपत्री पाने रंगविण्यासाठी नव्या उपक्रमांची भर कशाला, असे प्रश्न शैक्षणिक वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत.