तामिळनाडूच्या आंतरराष्ट्रीय मास्टर नारायण श्रीनाथने १० पैकी नऊ गुण मिळवीत येथे आयोजित फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत ७१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविले. साडेआठ गुणांसह भक्ती कुलकर्णी दुसऱ्या, तर आठ गुण मिळविणारा समीर कठमाळे तिसऱ्या स्थानावर राहिला.
येथे रेषा असोसिएट्स आणि राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. तामिळनाडूच्या श्रीनाथने शार्दूल गागरेला बरोबरीत रोखून विजेतेपद मिळविले. भक्ती कुलकर्णीने विनयकुमारवर आक्रमक खेळी करून विजय संपादन करीत ५१ हजारांचे पारितोषिक मिळविले. समीर कठमाळेने अमरावतीच्या प्रवीण दोडेला बरोबरीत रोखले. सकाळच्या सत्राप्रसंगी रघुनंदन गोखले, रफिक खान यांच्या हस्ते नाशिकची राष्ट्रीय बॅडमिंटनपटू सई नांदूरकर व ओम सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपाच्या कार्यक्रमास आ. सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, अनिल भालेराव, आयोजक अर्चना कुलकर्णी उपस्थित होत्या. आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे यांचीही आयोजकांना बहुमोल मदत झाली. सीमा हिरे यांनी पुढील वर्षीही अशीच भव्य स्पर्धा आयोजित करण्यात यावी, त्यासाठी येणाऱ्या खर्चाची आमदार निधीतून व्यवस्था करण्याची ग्वाही दिली. या स्पर्धेने नाशिकच्या १५ ते २० मुलांच्या यलो पॉइंटमध्ये वाढ झाली असून मानांकन नसलेल्या मुलांनाही मानांकन मिळेल, अशी ग्वाही नितीन शेनवी यांनी दिली. नाशिकमधील १३ मुलांनी बक्षीस मिळवून आघाडी घेतल्याने नाशिकच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी रेषा असोसिएट्सच्या अर्चना कुलकर्णी व मिलिंद कुलकर्णी यांनी पुढील वर्षी एप्रिलमध्ये परत अशी स्पर्धा भरविण्याचा मानस व्यक्त केला.