नाशिक : राज्य परिवहनच्या वाहकाकडून शुक्रवारी येथील अपंग खेळाडूला जबर मारहाण करण्यात आली. वाहकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही मंडळाने कर्मचाऱ्यावर कोणतीच कारवाई न केल्याचा निषेध नोंदवीत मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्य परिवहनच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत तत्काळ वाहकाचे निलंबनाचे आदेश देण्यात आले.

शुक्रवारी शहरातील ठक्कर बाजार परिसरात अपंग राष्ट्रीय खेळाडू खंडू कोटकर हे बाहेरगावी जाण्यासाठी आले होते. त्यावेळी बसमध्ये चढल्यानंतर कोटकर यांच्याशी वाहक शरद उंडे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. कोटकर यांनी वाद घालण्यापेक्षा आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात जाऊन तक्रार करा, असे सांगितले. आगार व्यवस्थापकाची धमकी दिल्याचा राग आल्याने उंडे याने कोटकर यांना धक्काबुक्की करीत बसमधून ढकलून दिले. व्यवस्थापकाच्या कार्यालयात नेऊन सर्व कर्मचाऱ्यांसमोर मारहाण केली.

याविरोधात प्रहारच्या वतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात उंडे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आल्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्याकडे तक्रार करण्यात आली. आठ दिवसानंतरही उंडे याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी प्रहारचे पदाधिकारी विभाग नियंत्रक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमा झाले.