09 August 2020

News Flash

विद्यार्थी वाहतुकीसाठी एसटीच्या ८६४ फेऱ्या

जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये एसटी महामंडळाकडे एकूण ११०० बसगाडय़ा आहेत.

 यंदाही ‘स्मार्ट कार्ड’च्या तुटवडय़ाची शक्यता

शाळा उघडण्याची घटीका समीप आल्याच्या पाश्र्वभूमीवर, एसटी महामंडळाने सुटीच्या काळात बंद ठेवलेल्या बसच्या फेऱ्यांचे नियोजन पूर्णत्वास नेले आहे. एखाद्या भागातून मागणी झाल्यास त्या अनुषंगाने नवीन बस फेरी सुरू केली जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रारंभी ८६४ फेऱ्या सुरू होत आहेत. उन्हाळी सुटीमुळे त्यातील बहुतांश फेऱ्या बंद होत्या. परंतु, सहा जूनपासून टप्प्याटप्प्याने त्या सुरू करण्यात येणार आहे. बसगाडय़ांच्या फेरीचे नियोजन नाशिक विभागाने केले असले तरी पासधारक विद्यार्थ्यांना यंदाही ‘स्मार्ट कार्ड’चा तुटवडा भेडसावतो की काय, अशी स्थिती आहे. सध्या आठ हजार ‘स्मार्ट कार्ड’ उपलब्ध असून मागविलेल्या ३० हजार कार्डची खुद्द महामंडळाला प्रतीक्षा आहे.

जून उजाडला की, बहुतेकांना शाळा उघडण्याचे वेध लागतात. मराठी माध्यमाच्या शाळा सहा जूनपासून तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा १३ ते १६ जूनच्या दरम्यान सुरू होत आहे. बारावी व इतर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होत असून प्रवेश प्रक्रियेपाठोपाठ महाविद्यालये लवकरच सुरू होतील. या एकंदर स्थितीत एसटी महामंडळाने संपूर्ण जिल्ह्यात विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या फेऱ्यांचे नव्याने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १३ आगारांमध्ये एसटी महामंडळाकडे एकूण ११०० बसगाडय़ा आहेत. त्यात शहर बस वाहतुकीच्या २१२ बसेसचाही अंतर्भाव आहे. गतवर्षी पासधारक विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ३० हजार इतकी होती. यंदाही ही संख्या कमी-अधिक फरकाने तितकीच राहण्याचा अंदाज आहे. या आधारे महामंडळाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी या वर्षी सुरूवातीला १३ तालुक्यात ८६४ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. एखाद्या भागातून नव्या फेरीची मागणी झाल्यास तिचा सकारात्मक विचार केला जाईल, असे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले. या नियोजनामुळे शाळा-महाविद्यालय सुरू होण्याच्या दिवसापासून विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करता येईल. एसटी बसमधून प्रवास करताना विद्यार्थ्यांना एकूण तिकीटाच्या जवळपास ६६ टक्के सवलत मिळते. सवलतीचे पास देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी महामंडळाने स्मार्ट कार्डची योजना मांडली. परंतु, या कार्डचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने गतवर्षी काही विद्यार्थ्यांना कागदी पास देण्याची वेळ महामंडळावर आली होती. शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सध्या महामंडळाकडे आठ हजार स्मार्ट कार्ड उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील पासधारक विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध पास यामध्ये जमीन-आसमानचा फरक आहे. पासधारक विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या वेळेची बचत करण्यासोबत वाहकांचे कामही सुलभ करण्याच्या उद्देशाने एस. टी. महामंडळाने मांडलेली ‘स्मार्ट कार्ड’ ही अत्याधुनिक स्वरुपात पास देण्याची योजना कार्डच्या तुटवडय़ामुळे गतवर्षी चर्चेत होती. यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. नाशिक विभागाने मुख्यालयाकडे जवळपास ३० हजार स्मार्ट कार्डची मागणी नोंदविली आहे. लवकरच ही कार्ड उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 3:30 am

Web Title: st increased bus service for student transportation
Next Stories
1 वन महोत्सवासाठी महापालिकेचा मदतीचा हात
2 डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या नियुक्तीने प्रथमच वाणिज्य विद्याशाखेला सन्मान
3 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत सोहळा
Just Now!
X