नाशिक महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवाजी गांगुर्डे व शिवसेनेकडून दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आज अर्ज दाखल केले. स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेना, भाजप या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेकडून अर्ज दाखल न झाल्याने सत्ताधारी भाजप व शिवसेनेत लढत रंगणार आहे.
महापौर रंजना भानसी यांनी स्थायी समितीच्या सदस्यांची यादी नुकतीच विशेष महासभेत जाहीर केली होती. या यादीमध्ये भाजपच्या ९ सदस्यांची निवड स्थायी समितीच्या सदस्यपदी झाली. यानंतर शिवसेनेचे ४, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी एक याप्रमाणे स्थायी समितीच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. समितीवरील एकूण १६ सदस्यांपैकी भाजपचे ९ सदस्य असल्याने महापौर, उपमहापौर पदानंतर स्थायी समितीच्या सभापती पदीदेखील भाजपलाच संधी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
स्थायी सभापती पदासाठी भाजप व शिवसेनेकडून आज अर्ज दाखल झाले. भाजपकडून जगदीश पाटील, सुनिता पिंगळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, विशाल संगमनेरे, सीमा ताजणे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, श्याम बडोदे अशा ९ सदस्यांची नियुक्ती स्थायी समितीवर करण्यात आली आहे. या सदस्यांपैकी शिवाजी गांगुर्डे यांना भाजपने निवडणुकीसाठी संधी दिली आहे. शिवसेनेच्या सुर्यकांत लवटे, दत्तात्रय सूर्यवंशी, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे या चार सद्स्यांची निवड स्थायी समितीच्या सदस्यपदी झाली असून शिवसेनेने दत्तात्रय सूर्यवंशी यांना संधी दिली आहे.
मनसेच्या मुशीर सय्यद, राष्ट्रवादीच्या राजेंद्र महाले आणि काँग्रेसच्या वत्सला खैरे यांची स्थायी समितीच्या सदस्य पदांवर नियुक्ती झाली आहे. मात्र यांपैकी कोणीही स्थायी सभापती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे स्थायी सभापतीपदाच्या या निवडणुकीत भाजप व शिवसेना या दोन पक्षांमध्येच लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 7:54 pm