‘नॅब’चा प्रस्ताव

दृष्टिबाधित विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्याने शारीर विज्ञानशास्त्रविषयक महाविद्यालय सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या संदर्भात विद्यापीठाने ‘नॅब’ने दिलेल्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आहे. या निर्णयामुळे अंध तसेच अपंग विद्यार्थ्यांना शारीर विज्ञानशास्त्रविषयक शिक्षण देणारे पहिले महाविद्यालय राज्यात सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

अपंग विद्यार्थी रुचिका पुरोहित हिने वैद्यकीय शिक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर अंध, अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची गरज अधोरेखित झाली. या प्रकरणाचा अभ्यास करत सर्वोच्च न्यायालयाने काही निकषांच्या आधारावर अंध तसेच अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक व्यंगाचा विचार करत वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाने ‘नॅब’ची अपेक्षा उंचावली असून दोन वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे. वास्तविक काही मोजकेच दृष्टिबाधित विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतात. त्यातही विषय शिक्षण घेतांना १२ वीनंतर ‘सीईटी’ बंधनकारक असल्याने त्यांच्या प्रगतीला खीळ बसते. या पाश्र्वभूमीवर, ‘नॅब’ने आरोग्य विद्यापीठाला अंध तसेच अपंग विद्यार्थ्यांना शारीर विज्ञानशास्त्र महाविद्यालय सुरू करण्याबाबतची मागणी करणारे पत्र दिले. याच कालावधीत राजस्थान, गुजरात, केरळ येथील विशेष महाविद्यालयांचा अभ्यास करण्यात आला. या संदर्भात नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी अंध तसेच अपंग विद्यार्थ्यांच्या बौद्धिक तसेच शारीरिक गरजा वेगळ्या असल्याचे सांगितले. त्यांना वैद्यकीय शिक्षण मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे. शारीर विज्ञानशास्त्र यावर पदविका, पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात यावा, अशी मागणी आरोग्य विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. याबाबत आमचे अभ्यास मंडळ या मुलांसाठी पाठय़क्रम तयार करणार असून तो विद्यापीठाला प्रस्ताव स्वरूपात सादर केला जाईल. यानंतर विद्यापीठाच्या सहकार्याने नाशिकमध्येच दृष्टिबाधितांसाठी पहिले महाविद्यालय सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विशेष विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन विचार

‘नॅब’कडून या संदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी भौतिक सुविधा अर्थात या विशेष विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक गरजा लक्षात घेता प्रशिक्षण देणारी यंत्रणा व शिक्षक यांची व्यवस्था करावी लागेल. त्या अनुषंगाने प्रस्तावावर विचार सुरू असून शारीर विज्ञानशास्त्राच्या वेगवेगळ्या आठ शाखा आहेत. विशेष विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यावर काम करावे लागेल.

डॉ. कालिदास चव्हाण (परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)