24 January 2020

News Flash

वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मदत केंद्र सुरू करावे

वनविभागाची सर्व भिस्त ही वन्यप्रेमी संस्थांवर असून वनविभाग जबाबदारी झटकत असल्याचा आरोप प्राणिमित्रांकडून केला जात आहे.

विजय धुमाळ यांनी जखमी मोराला वाचविण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत.

पर्यावरण आणि प्राणिमित्रांची मागणी

वाढत्या उन्हाळ्याचा जनावरे आणि पक्ष्यांना त्रास होत असून त्यांच्यासाठी तसेच अपघातामुळे जखमी झालेल्या पशू-पक्ष्यांवर त्वरित उपचारासाठी वन विभागाच्या वतीने मदत केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण आणि प्राणिमित्रांकडून करण्यात आली आहे. वनविभागाची सर्व भिस्त ही वन्यप्रेमी संस्थांवर असून वनविभाग जबाबदारी झटकत असल्याचा आरोप प्राणिमित्रांकडून केला जात आहे.

जिल्ह्य़ातील तापमान ४० अंशापर्यंत पोहचले आहे. शनिवारी पाणी तसेच अन्नाच्या शोधात जंगल परिसरातून बाहेर पडलेला मोर शहराच्या दिशेने आला. गंगापूर रोडवरील लोकमान्य नगर परिसरात त्याच्या मागे काही कुत्रे लागले. या कुत्र्यांच्या हल्ल्यात मोर जखमी झाला. परिसरातील विजय धुमाळ यांच्या हा प्रकार लक्षात आला. रविवार असल्याने पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने धुमाळ यांनी आमदार देवयानी फरांदे यांचे घर गाठले. मोर राष्ट्रीय पक्षी तसेच सूची एकमधील पक्षी असल्याने तो घरात ठेवता येत नसल्याने वन विभागाच्या सहकार्याच्या अपेक्षेत धुमाळ आणि फरांदे राहिले. वन विभागाकडून वेळेत उपचार न करता सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली.

वन विभागाच्या दिरंगाईमुळे मोराचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ात अन्य काही ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेने पक्षी जमिनीवर कोसळत असून यात कबुतरांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

या पार्श्वभूमीवर जखमी, अपघातग्रस्त प्राणी, पक्षी यांना नैसर्गिक अधिवास मिळावा यासाठी वन विभागाने पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी मदत केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. वन विभागाकडून अधिकृतपणे मदतवाहिनी क्रमांक जाहीर करण्यात यावा, जखमी-पशु पक्ष्यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावे,  अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

वन विभाग अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करत ही जबाबदारी वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांवर ढकलत आहे. सामाजिक संस्थांच्या हौशी प्राणी-पक्षी प्रेमींना साप पकडणे, वन्य जीव हाताळणे याचे प्रशिक्षण नाही. त्यामुळे जर काही अपघात झाला. तर जबाबदार कोण? असा सवालही पर्यावरण प्रेमींकडून विचारण्यात येत आहे.

वन विभागावर गुन्हे का दाखल करू नये?

वन विभागाने जी कामे स्वत केली पाहिजे ती कामे कोणताही अधिकार नसतांना वन्यप्रेमी मित्रांना करायला लावत असल्याचे चित्र नाशिक विभागात आहे. कुठेही साप निघो वा अन्य वन्य प्राणी, वन विभाग पोहोचण्याआधीच प्राणिमित्र त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. मग वन विभागाची गरज काय? वन विभागाला माहिती देऊनही जखमी प्राणी-पक्ष्यांसाठी काही होत नसेल, त्यांचा जीव जात असेल तर वन विभागावर गुन्हे का दाखल करू नये?

– प्रा. आनंद बोरा

(नेचर क्लब ऑफ नाशिक)

First Published on April 18, 2019 1:16 am

Web Title: start the help center for wild animals and birds
Next Stories
1 कापडीसदृश पिशव्यांमध्येही प्लास्टिकच!
2 शिकारीच्या शोधात बिबटय़ा विहिरीत
3 दिवसातील चार ते पाच तास पाणी भरणेच नशिबी
Just Now!
X