स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील विविध शाळांमध्ये वाहन खरेदीसाठी बनावट कागदपत्रे देऊन त्याआधारे बँकेला तीन कोटी, ७० लाख ११ हजार ४५९ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातपूर शाखा व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये १७ सप्टेंबर २०१५ ते १७ सप्टेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला.

या प्रकरणातील संशयित सचिन जाधवने दौलत कांबळे ऊर्फ सचिन पाटील, रुपाली कांबळे, पंकज जैन, वैशाली कोठावदे, यशवंत वाघमारे, अमित कोथमिरे, जितेंद्र माने, ऋषिकेश वर्पे, पूनम ओहनिक, मनीषा वाजे, अनिल सुरवसे, प्रशांत सोनवणे, सचिन जगताप, उमेश अहिरे, रुबिका साठे, पँटी चव्हाण, किसन झंवर, किरण झंवर, संदीप लाडू यांच्यासह २२ जणांनी मिळून बँकेच्या विविध शाखांमध्ये वाहन खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली.

ती कागदपत्रे वेगवेगळ्या शाखांमध्ये जमा करून त्यावर कर्ज घेतले. कर्जातून घेतलेल्या वाहनांसह यातील काही व्यक्ती बेपत्ता झाल्या. या प्रकरणात बँकेची तीन कोटी, ७० लाख ११ हजार ४५९ रुपयांना फसवणूक झाली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्य़ाची व्याप्ती पाहता तो सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आला.

कंचन मोटर्समध्ये ८२ लाखांचा अपहार

वाहन व्यवहारात टाटा कॅपिटल फायनान्सियल सर्विहसेस लिमिटेडच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून तिगरानिया रोडवरील कंचन मोटर्समध्ये ८२ लाख रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस टाण्यात टाटा कॅपिटल कंपनीचे अधिकारी मुकेश भगत, नरेंद्र कामत, कुमार नडार, हिमांशू सूद आणि दुष्यंत यादव (रा. मुंबई) या पाच अधिकाऱ्यांवर अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.