महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत येथे १८ ते २० जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचवटीतील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात या स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजीवकुमार मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी कंपनीचे प्रकल्प संचालक रवींद्र चव्हाण, सूरज वाघमारे, महावितरण नाशिकचे अभियंता दीपक कुमठेकर, महावितरण जळगाव परिमंडळचे जे. एम. पारधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ, कुस्ती, ब्रिज, क्रिकेट यांसह मैदानी खेळ होणार आहेत. औरंगाबाद, कराड, अमरावती, नागपूर, वाशी, पुणे आणि यजमान नाशिक अशा सात विभागांचे एकूण ७०० खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार असून या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विद्युत कंपनीच्या महाराष्ट्र संघाची निवड केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दाची भावना निर्माण व्हावी तसेच खेळामुळे मन आणि शरीर सुदृढ राहून सर्व कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळावी या उद्देशाने दर दोन वर्षांनी अशा क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती अभियंता भाऊराव राऊत यांनी दिली.