नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नाशिकरोड येथील पुरषिोत्तम हायस्कूलमध्ये २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत पहिल्या जिल्हास्तरीय वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाच्या वतीने चार दशकांपासून आयोजित ही स्पर्धा यंदा प्रथमच जिल्हास्तरावर घेण्यात येत आहे.
पुरोहित एकांकिका स्पर्धेमुळे जिल्ह्य़ातील बालनाटय़कर्मीसाठी हक्काचा रंगमंच उपलब्ध झाला आहे. १९७७ मध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने वामन पुरोहित यांच्या स्मरणार्थ संस्था स्तरावर या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. या स्पर्धेने नामवंत मराठी चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील, कुमार बापट, गिरीश ओक, राजीव पत्की, स्नेहा कुलकर्णी, गौरी केंद्रे, धनंजय वाबळे, किरण समेळ, शैलेश ढगे, श्रीनिवास मोरे यांसारखे ताकदीचे नाटय़कर्मी महाराष्ट्राला दिले. पुरोहित यांनी आयुष्याची ४५ वर्षे मराठी नाटक व त्यांच्या प्रयोगांसाठी समर्पित केली. नाशिककरांची नाटकाबद्दलची आवड लक्षात घेऊन त्यांनी नाशिकरोडचे तत्कालीन नगराध्यक्ष विठ्ठलराव अरिंगळे यांच्या मदतीने १९५५-५६ मध्ये नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात पहिले खुले नाटय़गृह बांधले. पृथ्वीराज थिएटरचे सर्वेसर्वा पृथ्वीराज कपूर यांनी या खुल्या रंगमंचला भेट दिली होती. नाशिक येथे १९४० मध्ये झालेल्या नाटय़ संमेलनाचे ते कार्याध्यक्ष तर १९४६च्या साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. वामनरावांच्या स्मृतीनिमित्त आयोजित या स्पर्धेस सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.