यंदाच्या शैक्षणिक वर्षांत पासधारकांची संख्या घटण्याची चिन्हे

नाशिक : विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील होता यावे तसेच त्यांचा शालेय प्रवास सुकर होण्यासाठी राज्य परिवहनने विद्यार्थ्यांसाठी मासिक सवलत पास योजना सुरू केली आहे. परंतु मागील वर्षांपासून राज्य परिवहन आणि महानगरपालिका यांच्यातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थी मासिक पासधारकांची संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणास सहाय्यकारी म्हणून राज्य परिवहनने विद्यार्थ्यांकडून केवळ ३३ टक्के भाडेआकारणी करत त्यांना मासिक भाडेदरात ६७ टक्के सवलत दिली. या सवलतीचा फायदा शहर तसेच जिल्हा परिसरात राहणारे विद्यार्थी मोठय़ा संख्येने घेत आहेत. पाच वर्षांपूर्वी शैक्षणिक वर्तुळातून मासिक पास सवलतीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ७० हजाराहून अधिक होती. बदलत्या गरजांनुसार तसेच राज्य परिवहनची वेळोवेळी होणारी भाडेवाढ, पगारवाढीसाठी अचानक पुकारले जाणारे संप, शाळांनी खासगी बससेवेचा पर्याय देत असतांना ‘डोअर टु डोअर’ ची दिलेली सुविधा यासह अन्य काही कारणांचा परिणाम बससेवेवर जाणवण्यास सुरूवात झाला. बससेवा तोटय़ात येत असल्याने साधारणत तीन वर्षांपासून राज्य परिवहनने आपल्या ३०० पेक्षा अधिक गाडय़ांची संख्या १२० पर्यंत कमी करत फेऱ्या कमी केल्या. महानगरपालिकेकडे तोटय़ात चालणारी बससेवा हस्तांतरीत होण्याची चर्चा असली तरी दोन वर्षांपासून त्यासंदर्भातील विषय अनिर्णित अवस्थेत आहे. याचा अप्रत्यक्ष फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शहर बससेवेच्या कमी फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल  होत आहेत.

गर्दीने भरलेल्या बसला लटकतच त्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सायकल किंवा अन्य दुचाकीच्या माध्यमातून काही अंशी का होईना आपली व्यवस्था केली असली तरी शालेय विद्यार्थ्यांना मात्र ऊन, पाऊस, थंडीत गर्दीत, मिळेल त्या बसच्या मागे धावत हा प्रवास पूर्ण करावा लागत आहे. यामुळे बऱ्याचदा अपघातही झाले असले तरी महानगरपालिका आणि राज्य परिवहन एकमेकांच्या कोर्टात चेंडू टोलवत आहेत.

दुसरीकडे, नाशिक महापालिकेच्या स्मार्ट रस्त्याचे काम दीड वर्षांपासून रखडल्याने त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ परिसरातील शाळा, महाविद्यालये, शालिमार परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळेत जावे लागते. त्यात रस्त्याच्या कामामुळे मुख्य रस्ता बंद असल्याने वाहनचालकांकडून पर्यायी मार्गाचा अवलंब होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या कोंडीतून जीव मुठीत घेत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम नव्या शैक्षणिक वर्षांत जाणवण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या उत्तराच्या प्रतीक्षेत

राज्य परिवहनच्या १२० गाडय़ा सध्या शहर बससेवेची धुरा सांभाळत आहेत. दिवसाला अडीच ते तीन हजार फेऱ्या होत आहेत. बस सेवेचा जास्तीजास्त फायदा हा विद्यार्थ्यांना होत आहे. मासिक पास सवलतीचा लाभ मार्चअखेर ४३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. नव्या शैक्षणिक वर्षांसाठी नोंदणी सुरू आहे. नाशिक महानगरपालिका शहर बससेवा ताब्यात घेणार आहे. परंतु, याबाबत अद्याप महापालिकेकडून कुठलेच उत्तर आलेले नाही.

-अरूण सिया (विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक विभाग)