भावली धरण यंदा उशिराने भरले

इगतपुरी : पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले असून जुलै महिन्यातच ओसंडून वाहणारे भावली धरण यंदा उशिरा भरले आहे. मागील वर्षी ३१ जुलैपर्यंत इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस झाला होता. तसेच दोन वेळा आलेल्या पुरामुळे आणि दीड महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाम, भावली ही दोन्ही धरणे तुडुंब झाली होती. या वर्षी भावली धरण भरण्यास ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडावा लागला. तालुक्यात भात पिकासाठी अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

या वर्षी नाशिक जिल्ह्य़ातील पावसाळी तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. एरवी या तालुक्यांमध्ये जुलै महिन्यातच सर्व नदी-नाले भरून वाहत असतात. सर्व लहान-मोठे धबधबे पूर्णपणे बहरात असतात.

इगतपुरी तालुक्यात गतवर्षी सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस होता अतिवृष्टी आणि दमदार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. ३१ जुलैअखेर सरासरीच्या ९८ टक्के पाऊस झाला होता. चार ऑगस्ट रोजी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. भाम आणि भावली धरणे ओसंडून वाहू लागली होती. तर अन्य धरणेही भरण्याच्या मार्गावर होती.

या वर्षी मात्र इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाची वानवाच आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचा तेवढा अपवाद.  दमदार पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत.

भावली धरण भरले म्हणजे इगतपुरी तालुक्याची बहुतांश चिंता दूर होते. या वर्षी जून, जुलै हे दोन्ही महिने कोरडेठाक गेले. धरणातील जलसाठा जेमतेमच शिल्लक होता. भावली धरण भरल्यानंतरच तालुक्यातील इतर धरणे भरण्यास सुरुवात होते. त्यामुळे आता आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर भाम, दारणा, कडवा, मुकणे, वैतरणा, वाकी आदी धरणेही भरतील. या वर्षी जर उर्वरित धरणे भरली नाहीत तर तालुक्याला दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.